स्प्लेंडरवरील क्रमांक सुझुकी एक्सेसला : पोलिसांना चकविण्यासाठी नामी शक्कल, दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
वाहतूक नियम मोडणाऱया वाहनचालकांना घरपोच नोटिसा जातात. त्यांना टीएमसी (ट्रफिक मॅनेजमेंट सेंटर) मध्ये जाऊन दंड भरावा लागतो. ही कारवाई चुकविण्यासाठी काही वाहनचालकांनी भलतीच शक्कल लढविल्याचे उघडकीस आले असून दुसऱयांच्या वाहनांवरील क्रमांक आपल्या वाहनांवर लावून पोलिसांना चकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शुक्रवारी कॅम्प पोलीस स्थानकात दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेला चुकविण्यासाठी अनेकजण आपल्या वाहनांवर चुकीच्या नंबरप्लेट लावत असल्याचे सामोरे आले आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या प्रकरणात तर भलत्याच व्यक्तीच्या दुचाकीवरील क्रमांकाचा वापर करून कारवाई चुकविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आदर्शनगर-वडगाव येथील विजयकुमार टी. यांनी येथील कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाने वाहतूक पोलीसही चक्रावले आहेत. कारवाई टाळण्यासाठी वाहनचालक कोणत्या कोणत्या क्लृप्त्या लढवत आहेत, याचे नमुनेच उघड होत आहेत. या प्रकारामुळे विजयकुमार यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला आहे.
विजयकुमार हे फार्मा कंपनी चालवितात. कंपनीच्या कामांसाठी एक हिरो स्प्लेंडर व एक टीव्हीएस ज्युपिटर अशी दोन वाहने त्यांनी घेतली आहेत. या वाहनांचा वापर त्यांचे कामगार करतात. 3 मार्च रोजी केए 22 ईएच 8883 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर चालविताना हेल्मेट परिधान केले नाही म्हणून नोटीस येते. 26 फेब्रुवारी 2022 रोजी क्लब रोडवरून जाताना वाहतूक नियम मोडल्याचा उल्लेख त्या नोटिसीत असतो. 1 हजार रुपये दंड भरण्याची सूचना केलेली असते.
26 फेब्रुवारी रोजी आपले कामगार क्लब रोड परिसरात गेले आहेत का? याची विजयकुमार चौकशी करतात. कारण त्या दिवशी त्यांची मोटारसायकल आस्थापनासमोरच असते. असे असताना नियम मोडल्याची नोटीस कशी येते? असा प्रश्न त्यांना पडतो. नोटीस घेऊन ते वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात पोहोचतात. टीएमसीमध्ये पोलिसांची भेट घेऊन चौकशी करतात.
अन् खरा प्रकार उघडकीस
आमची मोटारसायकल आस्थापनासमोरच असताना नोटीस कशी येते? अशी विचारणा करताच पोलिसांनी त्यांना एक फोटो दाखविला. फोटोमध्ये सुझुकी एक्सेस दुचाकीवर हेल्मेट परिधान न केलेला एक मुलगा बसलेला आहे. त्या दुचाकीसमोर लिहिलेला क्रमांक आपल्या स्प्लेंडरवरील क्रमांक आहे, असे कसे होऊ शकते? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळी पोलिसांना खरा प्रकार कळाला.
विजयकुमार यांच्या स्प्लेंडरवरील क्रमांक सुझुकी एक्सेसच्या समोर लावण्यात आला आहे. जर सुझुकी चालकाने वाहतूक नियम मोडले तर नोटिसा मात्र विजयकुमार यांच्या घरी जातात. हा प्रकार पाहून सारेच थक्क झाले. शेवटी कॅम्प पोलीस स्थानकात सुझुकीचा मालक आयुब अब्दुलखादर मकानदार (रा. गांधीनगर) याच्यासह दोघा जणांविरुद्ध भा.दं.वि. 419, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सावधगिरीचे आवाहन…
शुक्रवारी उघडकीस आलेल्या प्रकारामुळे पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. कारवाई टाळण्यासाठी भलत्याच व्यक्तीच्या वाहनांवरील क्रमांक आपल्या वाहनावर लावून फिरणाऱयांची संख्या काही कमी नाही. आता त्यांचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी दिली. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. एका वाहनावर दोन नंबरप्लेट लावणाऱयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱयांना दिली असून वाहनचालकांनाही अशा महाभागांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या सुझुकी एक्सेसच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्या दुचाकीच्या समोरील भागावर केए 22 ईएच 8883 हा क्रमांक आहे. तर पाठीमागे केए 22 ईएच 9893 हा क्रमांक लावण्यात आला आहे.









