मालवाहू, प्रवासी वाहनधारकांना दिलासा
बेंगळूर : कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे विविध क्षेत्रांना फटका बसला आहे. संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी जारी असलेल्या निर्बंधांमुळे सर्व मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांचे मालक अडचणीत असून त्यांना अनुकूल व्हावे, यासाठी मोटार वाहन शुल्क भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार 15 जूनपर्यंत कर भरण्यासाठी असणारी मुदत आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्नाटक मोटार वाहन कर कायदा 1957 च्या कलम 4(1) नुसार कर भरण्यासाठीचा नियम शिथिल करण्यात आला आहे. राज्यात नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी तो लागू असून विनादंड कर भरण्यासाठी असणारी मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. नव्या वाहनांच्या नोंदीसाठी मात्र ही सूट असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









