नवी दिल्ली
देशामधील कार आणि दुचाकीच्या किमती एप्रिल 2021 पासून वाढणार असल्याचे संकेत आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्याने कंपन्या दुचाकीची किमत पुन्हा वाढविण्याच्या विचारात आहेत. 2021 मध्ये वाहन कंपन्या दुसऱयांदा वाहनांच्या किमती वाढवत आहेत.
या अगोदर जानेवारी 2021 मध्ये वाहनांच्या किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढविलेल्या होत्या. मारुती सुझुकी, निस्सान, रेनॉ इंडिया, स्कोडा, होंडा कार्स, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, फोर्ड इंडिया, इसूजू, बीएमडब्लू इंडिया, ऑडी इंडिया, फोक्सवॅगन आदी कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ केल्याची माहिती आहे.
निस्सानने वाढविल्या किमती
दरम्यान निस्सान इंडियाने एप्रिलमध्ये वाहनांच्या किंमती वाढविणार असल्याची घोषणा केली आहे. निस्सानने कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा दाखला देत हा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या विविध गटातील कार्सच्या किमती पुढील महिन्यापासून वाढविणार असल्याचे सांगितले आहे.
हिरोमोटो कॉर्पच्या किमती 2500 रुपयांपर्यंत वाढणार
हिरोमोटो कॉर्प कंपनी 1 एप्रिल 2021 पासून मोटारसायकल आणि स्कूटर्सच्या किमती वाढविणार असल्याची माहिती आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे किमतीत वाढ होणार आहे. विविध टप्प्यावरील दुचाकी वाहनांच्या किमती 2500 रुपयांपर्यंत वाढणार असल्याचे हिरोमोटोने स्पष्ट केले आहे.









