‘कोव्हिड’च्या महामारीनं जबर तडाखा दिलेल्या वाहन उद्योगाला आता ही परिस्थिती काही प्रमाणात बदलण्याची चिन्हं दिसू लागलीत ती सणांचा मोसम सुरू झाल्यानं…या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमधील विक्रीची आकडेवारी ही काही विभागांसाठी उत्साह वाढविणारीच…
सणांचा मोसम सुरू झालाय…या पार्श्वभूमीवर ‘कार’ कंपन्यांना येऊ घातलेल्या दिवसांत जोरदार विक्रीचं स्वप्न दिसू लागलंय आणि त्यांनी ‘डिलर्स’ना अधिक वाहनांचा पुरवठा सुद्धा सुरू केलाय…‘पॅसेंजर व्हेइकल्स’ची ‘डिलिव्हरी’ सप्टेंबर महिन्यात 26 टक्क्मयांच्या वृद्धीसह 2.7 लाख युनिट्सवर पोहोचलीय. गेल्या वर्षी सप्टेंबरात ‘डिलिव्हरी’नं नोंद केली होती ती 2.1 लाख ‘युनिट्स’ची…‘टू-व्हीलर’चा विचार केल्यास दर्शन घडलंय ते 12 टक्के वाढीचं, 18.5 लाख ‘युनिट्स’चं (गेल्या वर्षी सप्टेंबरात 16.6 लाख ‘युनिट्स’)…‘मोटरसायकल’च्या ‘डिलिव्हरी’नं 17 टक्क्मयांच्या विस्तारासह 12.2 लाख ‘युनिट्स’चा (सप्टेंबर, 2019 मध्ये 10.4 लाख ‘युनिट्स’), तर ‘स्कूटर’नं 5.6 लाखांचा पल्ला गाठलाय (गेल्या सप्टेंबरमध्ये 5.5 लाख ‘युनिट्स’)…
2021-21 आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या दुसऱया तिमाहीत ‘पॅसेंजर व्हेइकल्स’च्या विक्रीनं 17 टक्क्यांच्या वृद्धीसाठी नोंद केलीय ती 7.3 लाख ‘युनिट्स’ची (गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीत विक्री 6.2 लाख ‘युनिट्स’). प्रवासी वाहनांमध्ये समावेश होतो तो ‘प्रवासी कार्स’, ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’, ‘व्हॅन्स’, ‘युटिलिटी व्हेइकल्स’ यांचा…चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत ‘दुचाक्यां’च्या ‘सेगमेंट’नं लहानशी पण महत्त्वपूर्ण वाढ नोंदविताना आकडा गाठला तो 46.9 लाखांचा (गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत 46.8 लाख)…परंतु व्यावसायिक म्हणजेच ‘कमर्शियल व्हेइकल्स’ना मात्र 20 टक्क्मयांच्या धक्क्याला सामोरं जावं लागलंय. त्या ‘सेक्टर’नं ‘जुलै-सप्टेंबर’ तिमाहीत समाधान मानलंय ते 1.3 लाख ‘युनिट्स’वर. व्यावसायिक वाहनांनी 2019-20 आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीत 1.7 लाख ग्राहकांना धडक देण्यात यश मिळविलं होतं…सर्व प्रकारच्या वाहनांचा विचार केल्यास 2019-20 आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीला दर्शन घडलं होतं ते 56.5 लाख ‘युनिट्स’च्या विक्रीचं, तर चालू आर्थिक वर्षातील ‘जुलै-सप्टेंबर’ या दुसऱया तिमाहीत 55.9 लाख ‘युनिट्स’च्या विक्रीसह घसरण पाहायला मिळालीय…
कंपन्यांनी सध्या सारं लक्ष केंद्रीत केलंय ते ‘नवरात्रोत्सव’ व ‘दिवाळी’ या हिंदूधर्मियांच्या अतिशय महत्त्वपूर्ण, जल्लोष-उत्साहाला, खरेदीला आमंत्रण देणाऱया सणांच्या दिवसांवर…‘कोव्हिड-19’च्या पार्श्वभूमीवर यंदा सारं विश्व 360 अंशांत फिरलंय अन् मागणीला ओहोटी लागलीय. खेरीज शहरांत लोकांवर मोठय़ा प्रमाणात नोकऱया गमावण्याची पाळी आल्यानं ताकद वाढलीय ती आर्थिक मंदीची…विशेष म्हणजे आस्थापनांनी धीर सोडलेला नसून त्यांना अजूनही दिसतेय ती ‘पॉझिटिव्हिटी’…सप्टेंबर महिन्याचा विचार केल्यास मार खाणारी एकमेव कंपनी म्हणजे ‘टोयोटा’. गेल्या सप्टेंबर महिन्याशी तुलना केल्यास त्यांची विक्री 20 टक्क्मयांनी घसरलीय. ‘मारुती सुझुकी’, ‘हय़ुंदाई’ आणि ‘होंडा कार्स’च्या विक्रीनं ‘डबल डिजीट’ची नोंद केलीय, तर ‘टाटा मोटर्स’ची उंची तब्बल 162 टक्क्मयांनी नि ‘किया’ची 147 टक्क्मयांनी वाढलीय. त्या दोन दिग्गज आस्थापनांना लाभ मिळालाय तो नवीन ‘मॉडेल्स’चा…‘मर्सिडीज बेंझ इंडिया’नंही ‘लक्झरी कार्स’च्या गटामध्ये बरीच मोठी झेप घेतलीय…‘टू-व्हीलर सेगमेंट’चा विचार केल्यास ‘हीरो मोटो’, ‘होंडा’ अन् ‘रॉयल एनफिल्ड’ यांनी नोंद केलीय ती वृद्धीची…
दरम्यान ‘मारुती सुझुकी’नं इशारा दिलाय की, गेल्या सप्टेंबर महिन्यातील निराशजनक परिस्थितीकडे लक्ष न देता आनंद, वृद्धी साजरी करणं चुकीचं ठरेल…अन्य काही कंपन्यांच्या मतानुसार, सणांचे दिवस संपल्यानंतरच विक्रीचं योग्य विश्लेषण करणं शक्मय होईल…परंतु यंदाच्या सप्टेंबर महिन्याकडे वा ‘जुलै ते सप्टेंबर’ तिमाहीकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाहीये, कारण वातावरण स्पष्टपणे बदललंय, विक्रीचे आकडे बदललेत. गेल्या ऑगस्ट महिन्याशी वा 2019-20 आर्थिक वर्षांची तुलना केल्यास त्याचं दर्शन घडेल. कित्येक आस्थापनांना खात्री आहे की, सणांच्या मोसमात दिसेल ती ग्राहकांची सकारात्मक वृत्ती…
अन्य एका घडामोडीनुसार, ‘एमजी मोटर’नं निर्णय घेतलाय, किमान सध्या तरी ठरविलंय ते येऊ घातलेल्या दिवसांत भारतात ‘काँट्रेक्ट मॅन्युफेक्चरिंग’च्या दिशेनं प्रवास करण्याचा…कंपनीनं ‘फॉक्सवॅगन’ व ‘महिंद्रा-फोर्ड’ यांच्याशी त्यासंबंधी चर्चा देखील सुरू केलीय…‘एमजी मोटर’नं ‘प्लांट’ ‘भाडेपट्टी’वर देण्याचा निर्णय घेतलाय…1924 साली जन्म झालेल्या ‘मॉरीस गराजस’ या ‘ब्रिटिश ब्रँड’चं चिनी आस्थापन ‘एसएआयसी’नं अधिग्रहण केलेलं असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘ग्लॉस्टर’नं (किंमत सुरू 29 लाख रुपयांपासून) भारतीय ग्राहकांना धडक दिलीय…सध्या ‘भारत-चीन’ यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कंपनीला नवीन गुंतवणुकीच्या वेळी सरकारच्या कडक तपासणीला सामोरं जावं लागलंय…
‘एमजी’नं चर्चेला यापूर्वीच प्रारंभ केलाय. कंपनीच्या ‘प्रवासी कार्स’चं उत्पादन ‘हालोल’ इथं असलेल्या कारखान्यात चालू असून त्यांनी इतर आस्थापनांच्या ‘मॉडेल्स’चं ‘सोर्सिंग’ करण्याचा विचार चालविलाय. सर्व प्रक्रिया ‘काँट्रेक्ट मॅन्युफेक्चरिंग’च्या साहाय्यानं पूर्ण करण्यात येईल. ‘चर्चेचं वर्णन अनौपचारिक वा ‘कॅज्युअल’ असं करणं चुकीचं असून ती गंभीरपणे, विचारपूर्वक चाललीय’, एका अधिकाऱयानं माहिती दिलीय…चर्चेत समावेश आहे तो ‘फॉक्सवॅगन ग्रुप’चा (त्यांनी ‘एसएआयसी’ व ‘एमजी’शी चीन नि युरोपमध्ये करार केलाय) आणि आपल्या ‘महिंद्रा-फोर्ड’चा…
विश्लेषकांच्या मते, कुठल्याही एका भागीदाराची निवड करणं हे सोपं काम नाहीये. ‘एमजी’ला त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. ‘मॉरीस गराजस’नं दोन्ही कंपन्यांशी वेगवेगळय़ा पद्धतीनं चर्चा केलीय…जगभरात ‘फॉक्सवॅगन’ व ‘एसएआयसी’ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असल्यामुळं ‘जर्मन कंपनी’चं पारडं जड वाटतंय. ‘फॉक्सवॅगन’ला ‘एमजी मोटर’शी असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांना भारतात नवीन दिशा दाखवायचीय, ‘एमजी’च्या साहाय्यानं त्यांचा विस्तार करायचाय. शिवाय जर्मन आस्थापनाला त्यांच्या भारतातील कारखान्यांची विक्री मंदावल्यानं कमी झालेली क्षमता सुद्धा वाढवायचीय…‘जनरल मोटर्स’नं आपल्या देशातून ‘पलायन’ करण्याचं ठरविल्यानंतर त्यांच्या गुजरातमधील ‘हालोल प्लांट’चं अधिग्रहण केलं ते ‘एमजी मोटर’नं. कारखान्याची क्षमता दरवर्षी 1 लाख ‘युनिट्स’चं उत्पादन करण्याची, पण ती ‘एमजी’च्या गरजेहून अधिक. आस्थापनाला सध्याच्या खराब वातावरणात देखील पूर्ण खात्री आहे ती जोरदार वृद्धीची !
‘कार्स ’ची विक्री…
कंपनी | सप्टेंबरमधील (2020) विक्री | वृद्धी |
मारूती सुझुकी | 147912 | 33.9 टक्के |
हय़ुंदाई | 50313 | 25 टक्के |
टाटा | 21200 | 161.7 टक्के |
किया | 18676 | 147.2 टक्के |
महिंद्रा | 14664 | 5 टक्के |
होंडा | 10199 | 9.7 टक्के |
रॅनो | 8805 | 5.5 टक्के |
फोर्ड | 5765 | 3.8 टक्के |
महत्त्वाच्या दुचाक्यांची स्थिती…
कंपनी | सप्टेंबरमधील (2020) विक्री | घसरण |
हीरो मोटोकॉर्प | 342940 | उणे 11.1 टक्के |
होंडा | 259935 | उणे 13.6 टक्के |
टीव्हीएस | 157347 | उणे 8.9 टक्के |
बजाज ऑटो | 122098 | उणे 20.8 टक्के |
– राजू प्रभू