‘कोरोना’ महामारीचा ज्या क्षेत्रांना सर्वांत जास्त धक्का बसलाय त्यात समावेश होणारं एक नाव वाहनांचं…अजूनही हा उद्योग डोकं वर काढू शकलेला नसला, तरी अलीकडच्या काळात भारतात लोकप्रियतेची वाढती लाट अनुभवणारा ‘एसयूव्ही’ विभाग मात्र चांगल्यापैकी प्रगती दाखवू लागलाय..
‘कोरोना व्हायरस’चा जबरदस्त धक्का बसलेल्या, निराशेच्या गर्तेत अक्षरशः कोसळलेल्या ‘वाहन उद्योगा’ला दिलासा देण्याचं छान काम केलंय ते नेहमीप्रमाणं ‘एसयूव्ही’नं म्हणजेच ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल’नं वा ‘ऑफ-रोडर’नं…त्यांनी आपल्या देशातील वाहन उद्योगाचा, कंपन्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न निश्चितच केलाय. ‘सियाम’नं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाशी तुलना केल्यास यंदा जुलै महिन्यात ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’नी वृद्धी नोंदविलीय ती 14 टक्क्यांच्या विक्रीची…या वाढीनं ‘सेडान’ व ‘हॅचबॅक’ (एकण 12 टक्क्यांची घट) नि ‘व्हॅन्स’ (19 टक्क्यांची घसरण) यांचं दुःख कमी करण्यास बऱयापैकी हातभार लावलाय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये…‘पॅसेंजर व्हेईकल्स’चा (त्यात समावेश ‘हॅचबॅक्स’, ‘सेडान्स’, ‘एसयूव्ही’ अन् ‘युटिलिटी व्हेइकल्स’ व ‘व्हॅन्स’चा) एकत्रित विचार केल्यास त्यांना जुलै महिन्यात फटका बसलाय तो फक्त 4 टक्क्यांचा…
‘ऑफ-रोडर्स’च्या समाधानकारक विक्रीला मोठय़ा प्रमाणात साथ मिळालीय ती ‘हय़ुंदाई’च्या ‘क्रेटा’ व ‘व्हेन्यू’ची, ‘किया’च्या ‘सेल्टस’ची, ‘मारूती’च्या ‘ब्रेझा’ नि ‘एर्टिगा’ची आणि ‘महिंद्रा’च्या ‘बॉलेरो’ची. विशेष म्हणजे ‘मर्सिडिज-बेंझ जीएलएस मॉडेल’नं देखील (किंमत 1 कोटी रुपयांहून अधिक) ग्राहकांना छान धडक दिलीय…‘प्रवासी वाहनां’च्या जुलै महिन्यातील एकूण विक्रीत ‘एसयूव्ही’चा हिस्सा 39 टक्क्यांवर पोहोचलाय (2019 वर्षातील जुलै महिन्यात विक्री 33 टक्के)…‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’संबंधीची आवड दिवसेंदिवस वाढत चाललीय…‘मारूती सुझुकी’चे संचालक (विक्री व मार्केटिंग) शशांक श्रीवास्तव यांनी म्हटलंय, ‘आम्हाला ‘ब्रेझा’सारख्या अनेक मॉडेल्सना असलेली ग्राहकांची मागणी पूर्ण करणं शक्य होत नाहीये’…
आपल्या देशात ‘कोव्हिड-19’नं मार्च महिन्यात प्रवेश करण्यापूर्वी दक्षिण कोरियाच्या ‘हय़ुंदाई’नं भारतीय ग्राहकांना दर्शन घडविलं होतं ते ‘क्रेटा’च्या नवीन ‘आवृत्ती’चं. कंपनीच्या कित्येक ‘मॉडेल्स’नी बाजारपेठेवर वर्चस्व गाजविण्यात बऱयापैकी यश मिळविलंय…‘हय़ुंदाई इंडिया’च्या मतानुसार, लोकांना ‘एसयूव्ही’ आवडतेय अन् त्यामुळं आस्थापनानं त्या गटातील नवीन उत्पादनांना जन्म देण्याचा निर्णय घेतलाय. कंपनी येऊ घातलेल्या दिवसांत लक्ष केंद्रीत करणार ते ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’वरच…‘लक्झरी सेगमेंट’मधील ‘ऑफ-रोडर्स’चा विचार केल्यास देखील ग्राहकांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिलाय. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मर्सिडिज-बेंझ’च्या ‘जीएलएस’ व ‘जीएलई मॉडेल्स’ची विक्री…‘भारतीय ग्राहकांचं ‘एसयूव्ही’वर प्रचंड प्रेम असून त्यांच्यावर आमच्या उत्पादनांचं सारं गणित अवलंबून आहे. सध्या आस्थापनाची बहुतेक विक्री पुढं पाऊल टाकतेय ती ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’च्या साहाय्यानंच’, ‘मर्सिडिज-बेंझ इंडिया’चे उपाध्यक्ष संतोष अय्यर सांगतात…
या क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते, ग्राहकांना सध्या ‘हॅचबॅक्स’ व ‘सेडान्स’ यांच्याऐवजी ‘एसयूव्ही’ची स्टाईल आवडतेय (ही बाब लक्षात घेऊन ‘अर्बन क्रूझर’च्या माध्यमातून ‘टॉयोटा किर्लोस्कर’ देखील या रिंगणात उडी घेऊ पाहत असल्याचं वृत्त आहे)…सध्या दोन गटांचा उदय होतोय. पहिल्यात ‘4 बाय 4’ क्षमतेच्या ‘शुद्ध ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’चा समावेश करावा लागेल. त्यांना साथ मिळतेय ती मोठय़ा ‘कार्गो स्पेस’ची अन् त्या कुठल्याही अवघड स्थानाला धडक देतात. शिवाय त्यांची किंमतही जास्त…परंतु खरी बाजी मारलीय ती ‘क्रॉस-ओव्हर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’नी. त्या लहान पण ‘कॉम्पॅक्ट’ असतात…या क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे ‘हय़ुंदाई’नं ‘एसयूव्ही सेगमेंट’चा विचार केल्यास दिग्गज ‘मारूती सुझुकी’वर केलेली मात. सध्या ‘हय़ुंदाई’नं भारतातील पहिल्या क्रमांकाची ‘ऑफ-रोडर कंपनी’ म्हणून मान मिळविलाय…दक्षिण कोरियाच्या त्या अव्वल, दर्जेदार आस्थापनानं ‘एंट्री-लेव्हल’ ‘व्हेन्यू स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल’वर बसून बाजी मारलीय (काही दिवसांपूर्वीच त्यांनी बाजारात उतरविलीय ती ‘सोनेट’ ही त्यांची भारतातील पहिलीवहिली ‘कॉम्पेक्ट एसयूव्ही’)…
पण यंदा एप्रिल ते जुलैदरम्यानच्या कालावधीत ‘हय़ुंदाई’ला ‘मारूती’वर वर्चस्व मिळविण्यास खरी मदत केलीय ती ग्राहकांना वेड लावलेल्या ‘क्रेटा’च्या नवीन आवृत्तीनं…‘हय़ुंदाई’च्या ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’नी 2020-21 आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत ‘मारूती सुझुकी’वर आघाडी मिळविलीय ती 1 हजार 635 ‘युनिट्स’ची…वाहन उद्योगाची ‘कोरोना’ नि उत्पादनांवरील मर्यादा, बंधनं यांच्याशी झुंज चालू असूनही ‘हय़ुंदाई’नं चार महिन्यांत कौतुकास्पद यश मिळविलं ते 34 हजार 212 ‘एसयूव्ही युनिट्स’ची विक्री करण्यात. याउलट ‘मारूती’ला समाधान मानावं लागलंय ते 32 हजार 577 ‘युनिट्स’वर…‘महिंद्रा अँड महिंद्रा’नं गेल्या 120 दिवसांत 22 हजार 477 ‘ऑफ-रोडर्स’ची विक्री केलीय…
‘ब्रेझा’ व ‘एर्टिगा’च्या जोरावर प्रतिस्पर्धी कंपन्यांना धडक देणाऱया ‘मारूती सुझुकी’च्या ‘मॉडेल्स’ची निर्मिती हरयाणा नि गुजरातमधील (फक्त जपानच्या ‘सुझुकी’च्या मालकीचा प्लांट) कारखान्यांत चालू असून आस्थापनाचा नेटानं प्रयत्न चाललाय तो उत्पादनांची पातळी स्थिर ठेवण्याचा. सुटे भाग योग्य त्यावेळी मिळत नसल्यामुळं ‘मारूती’वर वेळ आलीय ती चिंतेला सामोरं जाण्याची…2018-19 अन् 2019-20 आर्थिक वर्षांत या दिग्गज भारतीय वाहन कंपनीनं ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल’ गटात प्रथम क्रमांक मिळविला होता तो अनुक्रमे 2.6 लाख आणि 2.4 लाख ‘युनिट्स’ची विक्री करून…‘हय़ुंदाई’नं त्या दोन आर्थिक वर्षांत नोंद केली ती अनुक्रमे 1.3 लाख व 1.8 लाख ‘युनिट्स’चा…‘महिंद्रा’च्या 2.2 लाख (2018-19) नि 1.8 लाख (2019-20) ‘एसयूव्ही युनिट्स’नी ग्राहकांना कवेत धरलं…‘हय़ुंदाई’ला निःसंशय लाभ मिळालाय तो ‘मारूती सुझुकी’नं ‘डिझेल’ गटातून अंग काढून घेतल्यानं…
अन्य एका घडामोडीनुसार, ‘डिझेल’वर चालणाऱया वाहनांचं तोंडही पाहण्याची इच्छा नसलेल्या भारतीयांची संख्या हळूहळू वाढत चाललीय…2020-21 आर्थिक वर्षातील ‘एप्रिल ते जुलै’ या चार महिन्यांत ‘डिझेल’चा वापर करणाऱया लहान ‘कार्स’ व ‘सेडान्स’ यांचा आपल्या बाजारपेठेतील हिस्सा फक्त 1.8 टक्क्यांवर पोहोचलाय. भारतातील वाहन उद्योगाच्या इतिहासाचा विचार केल्यास ही ‘डिझेल’ची सर्वांत खराब कामगिरी…‘पेट्रोल’ नि ‘डिझेल’च्या किमतीमध्ये फारसं अंतर न राहिल्यानं ‘मारूती सुझुकी’, ‘फॉक्सवॅगन’नं यापूर्वीच ‘डिझेल सेगमेंट’ला ‘गूडबाय’ म्हटलंय…‘डिझेल’ वाहनं महाग असल्यामुळं ग्राहक सध्या त्यांची खरेदी करण्यास फारसा उत्सुक नाही. शिवाय एप्रिलपासून ‘बीएस-सिक्स इंजिन्स’नी भारतीय व्यासपीठावर प्रवेश केल्यानंही ‘डिझेल व्हेइकल्स’ची किंमत जरा जास्तच वाढलीय…
विशेष म्हणजे अचानक महत्त्व गमावलेल्या ‘डिझेल’ वाहनांवर ‘सीएनजी’नं देखील मात केलीय. ‘कार्स’ व ‘सेडान्स’च्या मार्केटचा विचार केल्यास ‘सीएनजी’चा हिस्सा 14 टक्क्यांवर पोहोचलाय…‘एसयूव्ही’ गटात तर ‘डिझेल व्हेईकल्स’चा हिस्सा तब्बल 43 टक्क्यांनी घसरलाय (एप्रिल ते जुलै, 2020)…आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे 2011-12 आर्थिक वर्षात भारतातील सुमारे 98 टक्के ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’ नि ‘युटिलिटी व्हेईकल्स’ यांना साथ मिळायची ती ‘डिझेल’ची. त्यावेळी बाजारपेठेत ‘पेट्रोल’ला स्थानच नव्हतं…मे, 2012 मध्ये दिल्लीत ‘पेट्रोल’ हे ‘डिझेल’पेक्षा प्रति लिटर तब्बल 33 रुपयांनी महाग होतं. सध्या भारताच्या राजधानीत हे अंतर पोहोचलंय फक्त 7 रुपयांवर. जुलै महिन्याच्या सुरुवातीला तर तिथं वाढलेल्या ‘व्हॅट’मुळं ‘डिझेल’नं ‘पेट्रोल’वरच मात करण्याच्या पराक्रमाचं दर्शन घडविलं होतं !
– राजू प्रभू









