बाळेपुंद्री / वार्ताहर
भरधाव वेगाने जाणाऱया वाहनाने चाळीसहून अधिक मेंढय़ांना चिरडले. सदर घटना सौंदत्तीजवळील हिरेउळीगेरी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मेंढपाळाचे पाच लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे.
या अपघातात काही बकरीसुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. या विषयी सौंदत्ती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बैलहोंगल तालुक्यातील मरडीनागलापूर गावचे मेंढपाळ यल्लाप्पा बिजनावर हे मेंढय़ांच्या कळपाला घेऊन बैलहोंगल शिवारमार्गे सौंदत्ती येथील हिरेउळिगेरी गावच्या शिवारात चारण्यासाठी घेऊन गेले होते. रविवारी पहाटे हिरेउळीगेरी गावानजीक अज्ञात वाहनाने मेंढय़ांना चिरडले. काही मेंढय़ांचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाल्या. तर काही मेंढय़ा गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनास्थळी सौंदत्तीचे सीपीआय नडविनमनी यांनी पाहणी केली.









