प्रतिनिधी/ महाबळेश्वर
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथील एसटी बस आगाराच्या जागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना पालिकेला केल्या आहेत. वाहनतळाच्या बांधकामासाठी साधारण 17 कोटी रूपयांचा निधी नगरविकास विभागाकडून पालिकेला मिळणार असल्याची माहीती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकारांना दिली.
महाबळेश्वर हे नावाजलेले थंड हवेचे ठिकाण असून येथे दरवर्षी साधारण वीस लाख पर्यटक भेट देतात. सलग सुट्टय़ामध्ये तसेच विविध हंगामात येथे पर्यटकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असल्याने शहराकडे येणाऱया रस्त्यांवर व शहरात वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने काही वर्षापूर्वी येथील रे-गार्डन परिसरात धर्मवीर छ. संभाजी महाराज वाहनतळ बांधला आहे. पंरतु येथील गर्दी पाहता हे वाहनतळ अपुरे पडत आहे. सध्या पालिकेने शहरातील एकमेव बाजारपेठेचे सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे, परंतु बाजारपेठेतील व्यापाऱयांनी वाहनतळाची सोय प्रथम करा असा आग्रह धरल्याने पालिकेने येथील एसटी बस आगारावर बहुमजली वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतच प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला केल्या आहेत. हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी पालिका व परिवहन विभागाच्या अधिकाऱयांनी येथील बस आगार व बसस्थानकाच्या जागेची पाहणी केली. या वेळी सातारा विभाग नियंत्रक सागर पळसुळे, पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील, आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे, बांधकाम विभागाच्या श्रीमती काशीद, पालिकेचे प्रणव सस्ते, सचिन दिक्षित हे उपस्थित होते.
पाहणी केल्यानंतर पालिकेतील कार्यालयात मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकारांना माहीती दिली. त्या पुढे म्हणाल्या की, सध्या पालिकेचे जे रे गार्डन येथे वाहनतळ आहे तेथे एक मजला वाढविण्यात येणार आहे. बस आगाराच्या जागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी नगरविकास विभागाकडून पालिकेला साधारण 17 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. पावसाळयातील चार महीने या बाबतचे सर्व सोपस्कार पूर्ण केले जातील व दिवाळी दरम्यान प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात येईल. मे 2023 पर्यंत बहुमजली वाहनतळ तयार झालेला असेल, अशी माहीती पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
सध्या पालिकेतील प्रशासकीय राजवटीत मोठय़ा प्रमाणावर महाबळेश्वरात विकास कामाचा धडाका सुरू असल्याचे नागरिकांना पहावयास मिळत आहे. यामध्ये बाजारपेठ सुशोभिकरण, दोन चौकाचे सुशोभिकरण पेटीट ग्रंथालया इमारतीचे नुतनी करण या शिवाय वेण्णानदी पात्रातील गाळ काढण्याचे काम नुकतेच हाती घेण्यात आले. लवकरच बसस्थानकावर बहुमजली वाहनतळाच्या बांधकामाला प्रारंभ होईल. पार्सनेज मार्केट, पालिका इमारत, सांस्कृतिक भवन दुरूस्ती, खाउगल्ली ही कामे देखील केली जाणार आहेत. विकास कामाचा मागील पाच वर्षातील अनुशेष भरूण काढण्याचे प्रयत्न पालिका प्रशासन करीत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.









