पणदूर, असलदे येथील वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
वार्ताहर / कसाल:
कारोना कालावधीत जागता पहारा देतानाच महामार्ग पोलिसांनी निराधार बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील संविताश्रम आणि कणकवली तालुक्यातील असलदे येथील आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कर्तव्यापलीकडील माणुसकी जोपासण्याचा हा एक प्रयत्न असल्याची भावना महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी व्यक्त केली.
जाधव म्हणाले, जिल्हय़ात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली एक-दीड वर्ष पोलीस बांधव तसेच प्रशासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व यंत्रणा सेवा बजावत आहेत. या सर्व यंत्रणेबरोबर पोलीस प्रशासनसुद्धा रस्त्यावर उतरून रात्रंदिवस सेवा देण्याचे काम करीत आहे. अनेक पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून सेवा बजावत आहेत.
सद्यस्थितीत कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब व निराधारांना मदत करणे, तेवढेच गरजेचे आहे. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन वाहतूक शाखेने जिल्हय़ातील निराधार बांधवांसाठी काम करणाऱया आश्रमांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार असलदे आणि पणदूर येथील आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महामार्ग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी, हेड कॉन्स्टेबल सुनील वेंगुर्लेकर, कॉन्स्टेबल संकेत चिंदरकर, कॉन्स्टेबल रणजित सावंत, पोलीस नाईक दिलीप पाटील, रविकांत बुचडे, अंकुश नाईक, अमोल गोसावी, हेमंत धुरी, जोसेफ डिसोजा आदी उपस्थित होते. संविताश्रमातर्फे या आश्रमाचे विश्वस्त, पोलीस पाटील देऊ सावंत यांनी महामार्ग वाहतूक शाखेतर्फे देण्यात आलेली ही मदत स्वीकारली व आश्रमातर्फे आभार मानले.









