प्रतिनिधी / म्हापसा
गोवा माईल्स आणि स्थानिक पर्यटक चालकांमधील गेले सहा महिने संपवू पाहात असलेला वाद काल पुन्हा एकदा उफाळून आला. यावेळी या वादात खुद्द कळंगुटचे आमदार तसेच मंत्री मायकल लोबो स्वतः सामील झाल्याचे दिसून आले. दरम्यान गोवा माईल्स कंपनीच्या पर्यटक गाडय़ांचे चालक कळंगुटात विमानतळावरील पर्यटकांना कळंगुटात ड्रोप केल्यानंतर परिसरात घुटमळत असतात त्याचप्रमाणे स्थानिक टॅक्सी चालकांच्या नाकावर टिच्चून कळंगुटातील भाडी मारतात अशा स्थानिक टॅक्सी चालकांच्या तक्रारी होत्या.
दरम्यान काल दुपारी असाच एक गोवा माईल्सचा पर्यटक गाडी चालक कळंगुटात पर्यटकांना ड्रोप केल्यानंतर स्थानिक भाडे घेण्याच्या प्रतीक्षेत सेंट आलेक्स चर्च परिसरात घुटमळत असतानाच कळंगुटातील पर्यटक टॅक्सी चालकांनी त्यांना अडवले व त्याच्याशी हुज्जत घातली. याचवेळी तेथून आपल्या ऑफीसकडे जाणाऱया स्थानिक आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी वाहतूक पोलिसांच्या हवाली केले. यावेळी वाहतूक नियमांचा भंग केल्याच्या कारणांवरून त्याला चलन देण्यात आले. यापुढे गोवा माईल्सच्या गाडी चालकांनी बाहेरील पर्यटकांना ड्रोप केल्यानंतर स्थानिक टॅक्सी वाल्यांच्या पोटावर पाय ठेवत बेकायदा भाडी न मारण्याचा त्याला इशारा दिला. सुदैवाने मंत्री मायकल लोबो यांनी प्रकरणात स्वतः हस्तक्षेप केल्याने त्या गोवा माईल्स चालकाला स्थानिकांचा प्रसाद मिळण्यापासून वाचवले.









