नूतन पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांची ग्वाही : वाहतूक समस्येबाबत सिटिझन्स कौन्सिलतर्फे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत बिकट आहे, याची मला कल्पना आली आहे. येत्या काही दिवसांत त्याबाबत संपूर्ण अभ्यास करून समस्येवर तोडगा शोधण्याबाबत आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही वाहतूक व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिली.
सिटिझन्स कौन्सिलतर्फे उद्योजक सतीश तेंडोलकर व सेवंतीलाल शाह यांनी सोमवारी सकाळी त्यांची भेट घेऊन शहराच्या वाहतूक समस्येबाबत निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या चर्चेत स्नेहा यांनी ही ग्वाही दिली.
निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. येथे मराठा लाईट इन्फंट्री, एअरफोर्स स्टेशन आहे. 50 हून अधिक महाविद्यालये असून उत्तर कर्नाटकातील हे महत्त्वाचे वाणिज्य केंद्र आहे. मात्र, या शहरात वाहतूक कोंडी ही मोठी डोकेदुखी आहे. दररोज दीडशेहून अधिक वाहनांची रस्त्यावर भर पडत आहे. वाहतूक पोलीस विभाग आपल्यापरीने प्रयत्न करत असले तरी ते प्रयत्न अपुरे ठरतात.
शहरात 1996 मध्ये वन वे लागू करण्यात आला. त्यानंतर अद्याप नवीन वन वे झाले नाहीत. रामदेव गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्ली, रविवारपेठ या ठिकाणी वाहतूक कोंडी नेहमीचीच आहे. भौगोलिकदृष्टय़ा विचार करता बेळगावमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे अधिक गल्ल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारे 3 अंतर्गत प्रमुख मार्ग शहरातून जाणाऱया राष्ट्रीय महामार्गाला जोडतात. त्यामुळे शहराच्या दोन्ही भागाकडून वाहने आत येतात आणि वाहनांची गर्दी होते. त्यामुळे अधिक वन वे सुरू करणे आवश्यक आहे. तिसरे रेल्वेगेट ते केएलईपर्यंत 9 महत्त्वाचे ट्रफिक सिग्नल्स आहेत. त्यापैकी फक्त 50 टक्के कार्यरत आहेत. त्यांची संख्या वाढवावी व असलेले ट्रफिक सिग्नल्स कार्यान्वित करावेत, अशी मागणी कौन्सिलने केली आहे.
पहिले रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटवा
पहिले रेल्वेगेट येथे गेल्या कित्येक वर्षांपासून बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. परंतु टिळकवाडीचा हा मध्यवर्ती भाग अनेक रस्त्यांना जोडणारा आहे. बॅरिकेड्समुळे अनेक समस्या निर्माण होत असून ते त्वरित हटवावेत. शहरातील मारुती गल्ली, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, मार्केट या भागात विपेत्यांची संख्या अधिक असून, त्यांचा वाहतुकीला अडथळा होतो. विपेत्यांना विक्री करण्याचा हक्क निश्चितच आहे. परंतु दिलेल्या जागेतच त्यांनी व्यवसाय करावा यासाठी आपण प्रयत्न करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
व्यापाऱयांना लक्ष्य करू नका
बेळगावमध्ये गोवा, कोकण, कोल्हापूर, हुबळी, धारवाड येथून व्यापारी येतात. परंतु कागदपत्रांच्या नावाखाली त्यांना अनेकदा निष्कारण लक्ष्य केले जाते. पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडावे. परंतु विनाकारण व्यापाऱयांना लक्ष्य करू नये. बेळगावला रिंगरोड नाही. त्यामुळे सर्व अवजड वाहने शहरातूनच ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. यासाठी देसूर आणि काकती येथे ट्रक टर्मिनल सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दररोज सायंकाळी 7 नंतर गोवा ते चोर्ला मार्गावरून 400 ट्रक्स ये-जा करतात. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी पेट्रोलिंग स्क्वॉडची नितांत गरज आहे. याशिवाय मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या दूर करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करावा व ट्रफिक वॉर्डनचा उपक्रम सुरू करावा, असेही सिटिझन्स कौन्सिलने निवेदनात नमूद केले आहे.
पोलीस उपायुक्त स्नेहा यांनी कौन्सिलच्या सर्व मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेऊन त्याबाबत येत्या काही दिवसात अभ्यास करून उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे योग्य नाही!
सध्या शहरात वाहने कशाही पद्धतीने कोठेही पार्क केली जातात. पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने लोकांनासुद्धा वाहने कुठे पार्क करावीत, हा प्रश्न पडतो. सध्या शहरात फक्त एकच वाहनतळ आहे. बहुमजली पार्किंगची कल्पना आम्ही मांडली आहे. परंतु ती अंमलात आणली गेली नाही. बहुमजली पार्किंग संकुल त्वरित उभारणे ही या शहराची तातडीची गरज आहे. पार्किंगची सुविधा उपलब्ध करून न देता वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे योग्य नाही.









