प्रतिनिधी / नाशिक
नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बिग बाजार व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी होत असून याकरिता मॉलचा “सर्वात स्वस्त दिवस” कार्यक्रम रद्द करण्याची कार्यवाही करून व्यवस्थापनावर कारवाई करावी, असे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय व शिष्ठमंडळाने उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकळे यांना दिले.
२६ जानेवारी व १५ ऑगस्टला नाशिकरोड येथील बिग बाजार मॉलमध्ये “सर्वात स्वस्त वस्तू विक्री” या शीर्षकाखाली वस्तूची विक्री होत असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी या मॉल मध्ये होते. बिग बाजार मॉल मध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पुरेशी वाहनतळ व्यवस्था मॉल व्यवस्थापनाकडे नसल्याने ग्राहक आपले वाहने रस्त्यावरच उभी करतात. सदरचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याने यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्यामुळे बेकायदेशीर पार्किंगमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मॉल परिसरातील राष्ट्रीय महामार्ग निमुळता असल्याने या भागात अनेक अपघात घडले असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मॉलच्या समोरील बाजूस असलेल्या प्रसिद्ध घंटी म्हसोबा महाराज मंदिरात दरवर्षी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षापासून प्रशासनाच्या दळभद्रीपणेमुळे म्हसोबा महाराज यात्रोत्सव वाहतूक कोंडीच्या कारणांमुळे मंदिरापासून लांब मागील बाजूस घेतले जाते. बिग बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यावेळी प्रशासन निद्रावस्थेत असताना भाविकांचे श्रध्दास्थान झालेले प्रसिद्ध घंटी म्हसोबा महाराज यात्रोत्सवावेळी प्रशासन खडबडून कसे जागे होते असा प्रश्न भाविकांकडून विचारण्यात येत आहे.
बिग बाजार मॉल व्यवस्थापनाच्या शून्य नियोजनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील होणारी वाहतूक कोंडी बघता ‘सर्वात स्वस्त दिवस’ हा कार्यक्रम रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या मार्फत वाहतूक कोंडी फोडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.









