वाहनधारकांना दीड तास अडकून पडावे लागले : रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाचा जोर आणि तिसऱया रेल्वे गेट फाटकावर सुरू असलेल्या कामामुळे शनिवारी सायंकाळी उत्सव हॉटेल परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक केंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना पुढे ना मागे जाता येईना. त्यामुळे दीड तास अडकून पडावे लागले. या परिसरातील अडथळय़ांना सामोरे जात वाहनधारकांची दीड तासानंतर सुटका झाली.
सायंकाळी 6.30 च्या दरम्यान उद्यमबाग परिसरातील कामगारांची घरी जाण्याची लगबग अशातच पावसाचा कहर आणि तिसरे रेल्वे गेट येथील फाटक बंद झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. तिसऱया रेल्वे गेटपासून उत्सव हॉटेलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी वाहनधारकांना आणि उद्यमबागमधील कामगारवर्गाला अडकून पडावे लागले. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना वाहन मागे घेणेदेखील मुश्कील बनले होते. वाहने पुढे सरकत नसल्याने अनेकजण अडकून पडले. दुचाकीचालक, चारचाकी वाहनधारक पुढे जाण्यासाठी नेहमीच आपली वाहने रेटत असतात. त्यामुळेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. पावसाच्या माऱयामुळे सर्वच नागरिक घरी पोहोचण्यासाठी घाई करत होते. त्यामुळेच वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. वाहतूक कोंडी इतकी मोठय़ा प्रमाणात झाली की कांही वाहनधारकांनी दुसऱया मार्गाचा अवलंब करून जाण्याचा प्रयत्न केला. येथील वाहने सरकत नसल्याने काही वाहनधारक अनगोळमार्गे तसेच राणी चन्नम्मानगरमधील रस्त्यामार्गे टिळकवाडीतील अंतर्गत रस्त्यामार्गे जात होते. या परिसरात रहदारी पोलीस नसल्याने ही समस्या नेहमीच भेडसावत असते.
शहरातील विविध चौकात रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच टिळकवाडी परिसरातील रेल्वे फाटकाजवळही रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात येत होती. मात्र अलिकडे कोणत्याच फाटकावर पोलिसांची नियुक्ती केली जात नाही. तर विविध चौकात हेल्मेट सक्तीच्या नावावर वाहनधारकांची तपासणी करीत थांबलेल्या पोलिसांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र वाहतूक कोंडीचे निवारण करण्यासाठी रहदारी पोलीस खात्याकडे पोलीस उपलब्ध नाहीत. त्यामुळेच शहरातील विविध चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. मात्र टिळकवाडी उद्यमबाग परिसरात शनिवारी सायंकाळी निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज
औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहनांसह कारखान्यातील कामगारांच्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच उद्यमबागसह खानापूर रोड, काँग्रेसरोडवर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर विविध फाटकावर रहदारी पोलीस नियुक्त करणे गरजेचे आहे. मात्र रहदारी पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. घरी जाण्यासाठी घिसाडघाई करणाऱया वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी रहदारी पोलीस नियुक्त करणे गरजेचे आहे. उद्यमबाग परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना अडचण झाली. यावेळी सर्वजण मोबाईलद्वारे व्हिडिओ शुटिंग करण्यातच गुंग होते. कोणीही समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना आढळून आले नाही. त्यामुळे नागरिक सुद्धा बेजबाबदार असल्याचे निदर्शनास आले. या परिसरात निर्माण होणाऱया वाहतूक कोंडी निवारणासाठी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









