गोवा म्हटला म्हणजे पर्यटकांचे हक्काचे स्थान. निसर्गसंपन्न अशा गोवा राज्यात सध्या अपघातांच्या मालिका चालू आहेत. तसेच वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. गोवा राज्यात सध्या महोत्सवांची धामधूम सुरू असल्याने साहजिकच देशी, पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. तसेच बहुतांश पर्यटक वाहनाने सफर करीत असल्यामुळे सध्या गोव्यातील रस्तेही अपुरे पडत आहेत. मुख्य पणजी राजधानीबरोबरच किनारी भागातील रस्तेही वाहनांनी फुल्ल असून सर्वसामान्यांना प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे. तसेच गोंयकाराचा वाहतूक कोंडीमुळे श्वास गुदमरतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गोवा राज्य म्हटले म्हणजे अनेक पर्यटकांची पावले याठिकाणी वळतात. समुद्रकिनारी, कॅसिनो संस्कृतीमुळे तसेच विविध महोत्सव व परिषदांची मांदियाळी यामुळे अनेक महनीय व्यक्तींची याठिकाणी वर्दळ पाहायला मिळते. त्यातल्या त्यात बहुतांश पर्यटक ‘रेन्ट अ बाईक’चा अवलंब करीत असल्याने तसेच स्वतःची वाहने आणत असल्याने गोवा राज्यातील बहुतांश रस्ते वाहनांनी फुल्ल असतात. यामुळे कामानिमित्त जाणारे अनेकजण अडकून पडतात. तसेच रुग्णवाहिकाही यात अडकून पडत असल्याने वाहतूक कोंडी जणू सर्वसामान्य गोंयकारांच्या पाचवीला पूजलेली आहे, असे म्हणावे लागेल.
गोवा राज्यात सध्या भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम जोरदार सुरू असून खोदण्यात येत असलेल्या चरांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वाहने तासन्तास अडकून पडतात. सध्या पर्यटक हंगाम तेजीत असल्याने पर्यटकांची वाहनेही यात अडकून पडतात. त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यातून अपघातही घडलेले आहेत. पेडणे तालुक्यात एका नवविवाहित महिलेचाही यात बळी गेलेला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे हे काम राज्यात काही ठिकाणी सुरू आहे. हे काम करणारा कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे समोर आले आहे. रस्ता खोदकाम करताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे तसेच वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवासी वाहनेही यात अडकून पडतात. त्यामुळे अनेकांना नियोजितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. गोवा वाहतूक पोलीस केवळ वाहनचालकांना दंड ठोठाविण्याचे काम करीत आहेत, वाहतूक सुरळीत करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ‘हम करे सो कायदा’ यावर सरकार सध्या जणू वावरत असल्याने गोंयकारांना बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
आपल्या सोयीप्रमाणे वेळकाळाचे बंधन न राखता खोदकाम सुरू आहे. कुठल्याच जंक्शनवर दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. तसेच वाहतूक पोलीस विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. तसेच धुळीचे साम्राज्य झाल्यामुळे प्रवाशांना तसेच नजिकच्या घरांना तसेच आस्थापनांना प्रचंड त्रास होत आहे. ज्या ठिकाणी केबल घालून काम पूर्ण झालेले आहे, त्या रस्त्यालाही व्यवस्थित बुजविण्याचे काम केलेले नाही. खड्डेमय आणि खडबडीत रस्त्यांमुळे दुचाकी वाहनांना गंभीर अपघात घडण्याची भीती आहे. सध्या गोवा राज्यात पिण्याचे पाणीही अनियमित मिळते. त्यात कहर म्हणजे ही भूमिगत केबल्स टाकत असताना पाणीजोडणीही तोडण्याचे प्रकार घडतात. यामुळे पाणी टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. गोवा राज्यात सध्या विरोधी पक्षाचे अस्तित्वच नसल्याने विरोधाला तेवढी धार शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी भाजप सरकारचा कारभार जनतेला न जुमानता सुरू आहे. गोंयकार मात्र सध्या ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ या पद्धतीने वागत आहे.
गोवा राज्यात अलीकडे सध्या अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. त्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक नियम न पाळणारी ही शालेय मुले बेदरकार वाहने हाकून आपल्याबरोबरच दुसऱयाचाही जीव धोक्यात घालत आहेत. कित्येकवेळा ती दारूच्या, ड्रग्जच्या नशेतही वाहने हाकत असल्याने अपघातांमध्ये अधिक भर पडत आहे. आपले पाल्य लहानपणीच गाडी चालविते, असा बहुतांश पालकांना अभिमान असतो व दुसरीकडे सध्या असे भयानक चित्र दिसत आहे. याला रोखणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
अल्पवयीनांनी वाहन चालवून अपघात केल्यास त्यांच्या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला जाणार आहे. जे पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास परवानगी देत आहेत किंवा अल्पवयीनांच्या वाहने चालविण्याकडे कानाडोळा करीत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाने वाजविली आहे. अल्पवयीन मुले वाहन चालवीत असताना अपघातात सापडली तर चूक कुणाची, हा मुद्दाच असणार नाही. थेट अल्पवयीनांच्या पालकांवर गुन्हे नोंदविले जातील. वास्को येथे 24 तासांत घडलेल्या दोन अल्पवयीन चालकांमुळे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय खऱया अर्थाने योग्यच आहे. यामुळे महागडय़ा, आलिशान गाडय़ा घेऊन बेदरकारपणे वाहने हाकणाऱया अल्पवयींना चाप बसणार आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये ‘खड्डेमुक्त गोवा’ ही सरकारची घोषणा होती परंतु आता खड्डेयुक्त गोवा करण्यासाठी गोवा सरकारचे प्रयत्न आहेत, असे खेदाने म्हणावे लागेल. राज्यातील प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या कामासाठी खोदले जात आहे. पणजीसारख्या राजधानीतही मार्गक्रमण करताना प्रवाशांना, वाहनचालकांना भयानक स्वरुपाचा सामना करावा लागत आहे. मोप विमानतळ कार्यान्वित झाल्यास यापुढे वाहतुकीच्यादृष्टीने भयानक स्थिती उद्भवणार असल्याचे आतापासूनच चित्र स्पष्ट होते. गोवावासियांना विकासाच्या नावाखाली होणाऱया संकटाचा व होणाऱया त्रासाचा अंत हवा आहे.
राजेश परब








