प्रवाशांनी दिला धक्का : वाहतुकीला अडथळा
बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील अशोक चौकापासून आरटीओ सर्कलच्या दिशेने मार्गस्थ झालेली परिवहनची एक बस अचानक रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. शहराच्या विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी डोकेदुखीची ठरत आहे. याबरोबरच आरटीओ सर्कल येथील वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. अशातच बुधवारी रस्त्यावरच नादुरुस्त होऊन बस बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. अखेर वाहतूक कोंडीत अडकलेल्या बसला प्रवाशांनी धक्का मारून बाहेर काढले.
भर रस्त्यातच बस बंद पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. आधीच वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आटीओ सर्कलपासून अशोक चौकाकडे जाणाऱया रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यातच बस नादुरुस्त होऊन बंद पडल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. आगारातून जुन्या बस वाहतुकीसाठी पाठविण्यात येत असल्याने असे प्रकार घडत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांतून क्यक्त होत आहेत. शहरातील अनेक प्रमुख रस्ते वेगवेगळय़ा कारणांमुळे वाहतूक कोंडीत गुरफटले आहेत. अशोक चौक ते आरटीओ सर्कलपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून मार्गस्थ होणारी बस तांत्रिक दोषामुळे रस्त्यावरच बंद पडल्याने पाठीमागून येणाऱया वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला होता.









