सिंगापूर अन् हाँगकाँगला मागे टाकले : ईआययूकडून सर्वेक्षण
वृत्तसंस्था / लंडन
इस्रायलचे तेल अवीव हे वास्तव्याच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. महागडय़ा शहरांच्या यादीत आघाडीवर राहणाऱया सिंगापूर, लंडन आणि हाँगकाँग यासारख्या शहरांना तेल अवीवने मागे टाकले आहे. इकोनॉमिक इंटेलिजेन्स युनिटच्या (ईआययू) जागतिक सर्वेक्षणातून हा निष्कर्ष निघाला आहे. तेल अवीव पहिल्यांदाच जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. पहिल्या 10 शहरांच्या यादीत भारताचे कुठलेच शहर सामील नाही.
जगातील एकूण 173 शहरांना सर्वेक्षण यादीत सामील करण्यात आले होते. वास्तव्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महाग मानल्या जाणाऱया शहरांचा यात समावेश होता. वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सच्या आधारावर हे निश्चित केले जाते. डॉलर्सच्या तुलनेत तेथील स्थानिक चलनाचे मूल्य काय आहे सर्व प्रथम पाहिले जाते. तेल अवीव हे इस्रायलचे शहर असून तेथील स्थानिक चलन शेकल आहे. स्थानिक परिवहन आणि ग्रॉसरीचे दरही सर्वेक्षणात पाहिले गेले.
दुसऱया स्थानी 2 शहरे
पॅरिस-सिंगापूर दुसऱया तर झ्यूरिच-हाँगकाँग तिसऱया स्थानावर आहेत. यंदा देखील न्यूयॉर्क शहर 6 व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जिनिव्हा, लॉस एंजिलिस आणि ओसाका यांचा क्रम लागतो. मागील वर्षी पॅरिस, झ्यूरिच आणि हाँगकाँगला पहिले स्थान मिळाले होते.
सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष
इटलीचे रोम शहर मानांकनात 32 व्या स्थानावरून 48 व्या स्थानावर पोहोचले आहे. अशाचप्रकारे इराणचे तेहरान शहर 79 व्या स्थानावरून 29 व्या स्थानावर पोहोचले. पण यामागे अमेरिकेचे निर्बंध कारणीभूत आहेत. सर्वेक्षणानुसार सीरियाचे हिंसाग्रस्त शहर दमास्कस सर्वात स्वस्त शहर आहे. ईआययू वर्षात दोनवेळा सर्वेक्षण आयोजित करते. यादरम्यान वैयक्तिक गरजांच्या 400 गोष्टी आणि 200 महत्त्वाच्या उत्पादनांचे दर पाहिले जातात. हे दर डॉलर्समध्ये मोजले जातात.
ऑगस्ट, सप्टेंबरचा डाटा
ईआययूने या सर्वेक्षणासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरचा मार्केट डाटा संग्रहित केला. उर्वरित शहरांच्या तुलनेत तेल अवीवमध्ये उत्पादने आणि हॉस्पिटॅलिटी रेट्स 3.5 टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वेक्षणादरम्यान कोरोना संकटामुळे उद्भवलेली स्थिती आणि किमती विचारात घेतल्या. सर्वेक्षणात महागाईचा सरासरी दर तपासत कराकस, दमास्क, ब्युनॉस आयर्स आणि तेहरान यांना सामील करण्यात आले नव्हते अशी माहिती ईआययूच्या प्रमुख उपासना दत्त यांनी दिली आहे.









