प्रतिनिधी / वास्को
लॉकडाऊनच्या काळात मुक्त संचाराला बंदी असली तरी वास्को व परिसरात लोकांचा मुक्त संचार बराच वाढलेला आहे. पोलिसांनी संचारबंदी शिथील केली आहे का ? असा संशय यावा अशी परिस्थिती वास्कोत निर्माण झालेली असून पोलिसांच्या कारवाईचाही धसका वाहनचालक घेत नसल्याचे दिसून येते. संचारबंदी नियम झुगारत असल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 55 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वास्को व परिसरात संचारबंदी शिथील करण्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशभरात लॉकडाऊन आहे. लोकांना घरातच राहाण्याचे आवाहन गेल्या सतरा दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळे जागृती कार्यक्रम हाती घेतले जात आहे. पोलिसांचे खास पथकही वाडय़ांवाडय़ांवर जाऊन गाणी गात लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, लोकांचा मुक्त संचार वाढतच आहे. काही दिवस वास्को शहरातील रस्ते ओस पडले होते. मात्र, सध्या या रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठय़ा प्रमाणात धावताना दिवसात. फुटपाथवरही दुचाकी व चारचाकी वाहने मोठय़ा प्रमाणात पार्क केलेली आढळतात. सर्वत्र लॉकडाऊन आहे तर ही वाहने का फिरतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रारंभी सकाळच्या वेळीच साधारण दहा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची वर्दळ दिसायची. आता सकाळ-सायंकाळ वाहनांचा मुक्त संचार होताना दिसत आहे. पोलिसांचीही या परिस्थितीपुढे गोची झालेली दिसत आहे.
बरेच युवक परिसरात नाहक येरझाऱया घालीत असून त्यांना परिस्थितीचेच भान नसल्याचे दिसून येते. अशा लोकांविरूध्द पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून कारवाई हाती घेऊन अनेकांविरूध्द गुन्हे नोंद केले. त्यांची वाहनेही जप्त केली. सध्या वास्को पोलीसस्थानकाच्या आवारात 55 दुचाक्या उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत. या वाहनांची सुटका आता न्यायालयातील सोपस्कार उरकल्यानंतरच होणार आहे. मात्र, तरीही काहीजण धसका घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे संचारबंदीतही वर्दळ वाढू लागली आहे.









