मुरगावच्या माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा आरोप, नगराध्यक्षांबाबत संशय
प्रतिनिधी / वास्को
जवळपास पन्नास वर्षांपूर्वी सरकारने हिंदु स्मशानभूमीसाठी बहाल केलेल्या जमीनीचा मुळ उद्देश हाणून पाडण्याचा प्रयत्न काही जणांकडून होऊ लागल्याची चर्चा वास्कोत सुरू झाली आहे. कधी काळी हरीत क्षेत्र असलेली ही जमीन स्मशानभूमीसाठी हरीत क्षेत्रातून मुक्त करण्यात आली होती. ती पुन्हा हरीत क्षेत्रात समाविष्ठ करण्यासाठी मुरगावच्या पीडीएने प्रस्ताव तयार केलेला असून तसा अधिकृत ठराव सरकारला नवीन बाहय़ विकास आराखडय़ाच्या निमित्ताने पाठवलेला आहे असा आरोप मुरगावचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक क्रितेश गावकर यांनी केला आहे.
शुक्रवारी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक क्रितेश गावकर यांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांमार्फत सरकारने 1970 साली मायमोळे वास्को येथील 6892 चौ. मिटर जमीन हिंदु धर्मियांच्या स्मशानभूमीसाठी मुरगाव पालिकेकडे सुपुर्द केली होती. त्यामुळे गेली पन्नास वर्षे ही जमीन स्मशानभूमी या एकमेव उद्देशाने राखीव ठेवण्यात आलेली आहे. मध्यंतरी 2013 साली ही जमीन मुरगाव पालिकेने स्मशानभूमी प्रकल्प उभारण्यासाठी मुरगाव हिंदु समाजाकडे सुपुर्द करण्यात आली होती. ही जमीन पूर्वी हरीत क्षेत्र होती. परंतु स्मशानभूमी प्रकल्पासाठी ही जमीन हरीत क्षेत्रातून मुक्त करण्यात आलेली आहे. त्याचा लाभ बाजुच्या खासगी जमीनीलाही झालेला आहे. मुरगाव हिंदु समाजाचे अध्यक्ष व उद्योगपती नाना बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आधुनिक पध्दतीची स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. हिंदु समाजातील तत्कालीन मान्यवरांनी भविष्याचा विचार करून नवीन स्वातंत्र जागेचे नियोजन केले होते. खासदार निधी किंवा सरकारच्या मदतीने प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न जारी होते. मात्र, सध्या या नियोजनाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न होऊ लागलेला असून या मागे षडयंत्र आहे. मुरगाव पालिकेचीही भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप नगरसेवक क्रितेश गावकर यांनी केला आहे.
स्मशानभूमी प्रकल्प उभारू नये म्हणून क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न
त्यांनी दिलेल्या माािहितीनुसार 18 डिसेंबर 2019 या दिवशी मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाची एक बैठक झाली. या बैठकीत या प्राधिकरणाने मायमोळेतील स्मशानभूमीसाठी राखीव असलेली व मुरगाव हिंदु समाजाच्या ताब्यातील सदर सुमारे 7 हजार चौ.मि. जमीन पुन्हा हरीत क्षेत्र मुक्त जमीन पुन्हा हरीत क्षेत्रात समाविष्ठ करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. येणाऱया नवीन 2020 ते 2026 च्या बाहय़ विकास आराखडय़ात ही जमीन हरीत क्षेत्र असल्याची अधिकृत नोंद करण्याचा हा प्रयत्न असून हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास त्या जमीनीवर स्मशानभूमीसारख प्रकल्प उभारणे शक्य होणार नाही. त्या ठिकाणी स्मशानभूमीसारखा प्रकल्प उभारला जाऊ नये यासाठीच हा प्रयत्न होऊ लागल्याचा संशय नगरसेवक गावकर यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्षांनी पालिकेला अंधारात ठेवले
मुरगाव पालिकेचा एक प्रतिनिधी म्हणून मुरगावच्या नगराध्यक्षांची निवड मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणावर करण्यात आलेली आहे. नगराध्यक्ष या प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये उपस्थित असतात. मात्र, त्यांनी पालिकेला या विषयावर अंधारात ठेवलेले आहे. बैठकीमध्ये त्यांनी या निर्णयाला विरोधही केला नाही. त्यांचाही या साऱया प्रकरणात स्वार्थ असावा असा संशय गावकर यांनी व्यक्त केला. जनतेचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची गरज होती. हा प्रयत्न हाणून पाडायला हवा असे ते म्हणाले.
नगरसेवक मुरारी बांदेकर व सैफुल्ला खान यांच्याकडूनही टीका
नगरसेवक मुरारी बांदेकर यांनीही या प्रश्नी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्यावर टीका केली. बाजुची खासगी जमीन हरीत क्षेत्रापासून मुक्त ठेवून केवळ स्मशानभूमीच्या जमीनीचा दर्जा बदलण्याचा प्रयत्न करणे हा संशयस्पद प्रकार असून त्या ठिकाणी स्मशानभूमी उभारल्यास बफर झोनचा नियम लागू होणार आहे. त्यामुळे बाजुच्या खासगी जमीनीवर गडांतर येईल. त्यामुळे स्मशानभूमीच्या जमनीचे क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही या प्रश्नी दाद मागू अशी माहिती मुरारी बांदेकर यांनी दिली. नगरसेवक सैफुल्ला खान यांनीही हिंदु स्मशानभूमीच्या जमीनीबाबत होत असलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. हा चुकीचा प्रकार असून वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी खान यांनी केली.
‘तसे काहीच नाही’ नगराध्यक्षांनी आरोप फेटाळले
दरम्यान, मुरगावच नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी क्रितेश गावकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मायमोळे येथील स्मशानभूमीच्या जमीनीचे क्षेत्र बदलण्याचा कोणताच प्रयत्न पीडीएच्या बैठकीत झालेला नाही. गावकर हे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहे. अशा प्रकाराला सर्वात आधी आपण विरोध करीन. परंतु तसा कोणताही प्रकारला घडलेला नाही. त्या जमीनीच्या शेजारी एक खासगी बांधकाम चाललेले असून मुरगाव पालिकेने त्या बांधकामाला नोटीस बजावलेले आहे असे नगराध्यक्ष राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या सुडामार्फत प्रकल्प होणारच- मनिष आरोलकर
दरम्यान, मुरगावचे माजी नगराध्यक्ष व मुरगाव हिंदु समाजाचे पदाधिकारी तसेच मायमोळेतील त्या जमीनीवर होणाऱया नियोजित पर्यावरणस्नेही स्मशानभूमी प्रकल्पाचे प्रमुख मनिष आरोलकर यांनी पीडीएने घेतलेल्या त्या निर्णयाला यापूर्वीच आक्षेप घेतलेला असून त्यांनी यासंबंधी मुरगाव पालिकेकडेही तक्रार दिलेली आहे. पीडीएचा तो प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्या जमीनीवर पर्यावरणस्नेही स्मशानभूमी उभारण्यात येणार असून नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या सहकार्याने सुडा या सरकारच्या संस्थेमार्फत त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे निश्चीत झालेले आहे. त्या प्रक्रियेलाही मुरगाव हिंदु समाजाने सुरवात केलेली आहे असे आरोलकर यांनी स्पष्ट केले.









