प्रतिनिधी/ वास्को
वास्कोतील कदंब बस स्थानकाजवळील एका इमारतीसमोरील वृक्ष कोसळून तीन मिनी बसगाडय़ांसह सहा वाहनांचे नुकसान झाले. त्यात वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले तर दोघे किरकोळ जखमी झाले.
वास्कोतील मुंडवेल वाडे भागातील कदंब बस स्थानकापासून काही अंतरावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. या ठिकाणी एका इमारतीसमोर भला मोठा जुना वृक्ष होता. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा वृक्ष उन्मळून खाली कोसळला. तेथील इमारतीसमोर व या वृक्षाखाली तेथीलच मालकाच्या तीन मिनी बसगाडय़ा होत्या. तसेच अन्य दोन कार व एक जेसीबी वाहन होते. या वाहनांवर तो वृक्ष कोसळल्याने सर्व वाहनांचे नुकसान झाले. त्या वृक्षाखाली एक बस पूर्णपणे चिरडली गेली. दुसऱया बसचीही बऱयाच प्रमाणात हानी झाली. अन्य एक बस व दोन कार तसेच जेसीबीचीही या घटनेत हानी झाली. या घटनेतील नुकसानीचा निश्चित आकडा संध्याकाळपर्यंत स्पष्ट झाला नव्हता. मात्र, ही नुकसानी लाखोंच्या घरात आहे. वृक्ष कोसळलेल्याच ठिकाणी भाजी विक्रीचा एक गाडा आहे. सुदैवानेच हा गाडा बचावला. या घटनेत दोघांना दुखापत झाली.
वाहतुकीची कोंडी भाजी विक्रीचा गाडा सुदैवाने बचावला
ही घटना मुख्य रस्त्याशेजारीच घडल्याने सुरळीत वाहतुकीवरही परिणाम झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत चिखली ते वास्को शहरातील सेंट ऍड्रय़ू चर्चपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. हा वृक्ष कोसळल्यानंतर जवळच असलेल्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. सदर वृक्ष कापून त्या परिसरात निर्माण झालेला अडथळा दूर करण्याच्या कार्यात अग्निशामक दल शनिवारी रात्री उशिरापर्यंत व्यस्त होते. वास्को पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.









