प्रतिनिधी / वास्को
वास्को शहरातील एक फ्लॅट दिवसाढवळय़ा फोडून चोरटय़ांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी वास्को पोलिसांनी दोघा संशयीत चोरटय़ांना अटक केली आहे. या चोरीसंबंधी घर मालकाने वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या चोरीत सोन्याचे दागिने व रोख लंपास करण्यात आली.
वास्को शहरातील खलप मॅनशन या इमारतीतील तिसऱया मजल्यावरील फ्लॅटमध्ये शुक्रवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 च्या दरम्यान ही चोरी झाली होती. यावेळेत घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटय़ांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून आत प्रवेश केला. त्यांनी या फ्लॅटमधील कपाट फोडून आतील सोन्याचे दागिने व रोख मिळून 1 लाख 90 हजारांचा ऐवज लंपास केला. घर मालक घरी आल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. त्यामुळे पोलीस तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न करताना दोघा संशयीत चोरटय़ांना अटक केली. एका चोरटय़ाचे नाव मांतेश गोलार (23) असे असून तो खारवीवाडा वास्को येथील राहणारा आहे. तर दुसरा चोरटा हुबळीचा असून त्याचे नाव शंकर आलूर (25) असे आहे. वास्को पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









