क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी वास्को येथील टिळक मैदानावर हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान संघात लढत होईल. सध्या एटीके मोहन बागानचे 18 सामन्यांतून 39 गुण असून ते पहिल्या तर हैदराबाद एफसीचे 27 गुण असून ते चौथ्या स्थानावर आहेत.
हैदराबादचा संघ फार अपेक्षा नसतानाही बाद फेरीच्या उंबरठय़ावर आहे. त्यांची कामगिरी आश्चर्यजनक ठरली आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बाद फेरी गाठण्याची त्यांना संधी आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीपासून हा संघ अपराजित असून गेल्या दहा सामन्यांत त्यांनी ही मालिका राखली आहे. या लढतीत पराभव झाला नाही तर पहिल्या चार संघांमधील स्थान कायम राखण्याच्या आणखी जवळ ते जातील. याशिवाय स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाची अपराजित मालिका नोंदविण्यात त्यांना यश येईल. हैदराबाद संघाचा हा केवळ दुसराचा मोसम आहे.
या निर्णायक अशा लढतीत आघाडीवरील संघाविरूद्ध खेळण्यासाठी प्रेरणा मिळण्यास त्यांच्यासमोर अनेक मुद्दे आहेत. हैदराबादप्रमाणेचे एटीके मोहन बागान सुद्धा चमकदार फॉर्ममध्ये आहे. सलग पाच सामने जिंकल्यामुळे या संघाने मुंबई सिटी एफसीला आघाडीच्या स्थानावरून हटविले आहे. या टप्प्यात त्यांनी 13 गोल केले आहेत तर त्यांच्याविरूद्ध फक्त पाच गोल झाले आहेत.
एटीकेएमबीचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला असला तरी विजयासाठी हैदराबाद इतक्याच निर्धाराने खेळेल. विजय मिळाल्यास साखळीतील अव्वल स्थानासाठी शिल्ड तसेच एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील प्रवेशावर ते शिक्कामोर्तब करू शकतील, तसे झाल्यास ही लढत त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरेल.
या घडीला एटीकेएमबीविरूद्ध खेळणे हे आपल्या संघासाठी एक आकर्षक आव्हानच ठरेल, असे हैदराबादचे प्रशिक्षक मान्यूएल मार्क्वेझ म्हणाले. स्पर्धेतील सर्वाधिक बलाढय़ संघाविरूद्ध आम्ही खेळणार आहोत. लीगमधील त्यांचा फॉर्म सर्वोत्तम ठरला आहे. त्यांचा संघ अत्यंत संघटीत आहे, असे मार्क्वेझ म्हणाले. या घडीला प्रशिक्षक आंतोनियो लोपेझ हबास यांना अपेक्षित असलेल्या शैलीचा खेळ करू शकणारे फार चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. लॅनी रॉड्रिग्स आणि मार्सेलिनो परेरा यांच्या समावेशामुळे त्यांचा खेळ आणखी भेदक झाला आहे.
हैदराबाद एफसीसमोर स्पर्धेतील सर्वात भक्कम बचावफळीचे आव्हान असेल. याशिवाय त्यांना प्रतिस्पर्धी संघाचा आाधारस्तंभ रॉय कृष्णा यालाही रोखावे लागेल. कृष्णाने आतापर्यंत सर्वाधिक गोल केले आहेत. फिजीच्या या स्ट्रायकरने 18 गोलांचे योगदान दिले असून गेल्या सलग सहा सामन्यांत तो गोल करत आहे. माझ्यादृष्टिने रॉय कृष्णा हा स्पर्धेतील सर्वोत्तम स्ट्रायकर आहे. तो अनेक मागाने गोल करू शकतो. तो फार उंचा नसला तरी धुर्त आहे. तो वेगवान खेळ करतो आणि परिपूर्ण असा सेंटर फॉरवर्ड आहे.
या लढतीत दुसऱया सत्रातील खेळ निर्णायक ठरू शकतो. दोन्ही संघ मध्यंतरानंतर परिणामकारक ठरले आहेत. एटीकेएमबीने 26 पैकी 21 गोल दुसऱया सत्रात केले आहेत. हैदराबादच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या अनेकांपैकी हबास एक आहेत. हैदराबादसाठी मोसम चांगला चांगला ठयला आहे. त्यांच्याविरूद्ध आम्हाला आत्मविश्वासाने खेळावे लागेल. आघाडी आणि बचावफळीत त्यांनी चांगले संतुलन साधले आहे.









