प्रतिनिधी / वास्को
आल्त दाबोळी वास्को येथील एका चोरी प्रकरणी वास्को पोलिसांनी चोरटय़ाला गजाआड करून त्याच्याकडून चोरीचा ऐवजही हस्तगत केला आहे. चोरीची तक्रार नोंद झाल्यानंतर चार तासांच्या आत पोलिसांनी चोराला अटक केली.
अधिक माहितीनुसार बुधवारी आल्त दाबोळीतील विशाल मॅगा मार्टच्या बाहेरील बॅग काऊन्टरमधील एक बॅग चोरीस गेल्याची तक्रार वास्को पोलीस स्थानकात नोंद झाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्वरीत हालचाली करून त्या चोरास हुडकून काढले. अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव देविदास पालेकर(49) असे असून तो पोंटेमळ कुडचडे येथील आहे. त्याने चोरलेल्या त्या बॅगेमध्ये 52 हजार रूपये किमतीचा एक आयफोन, 2800 रूपये किमतीची मनगटी घडय़ाळ तसेच 2500 रूपयांची रोख असा ऐवज होता. चोरटय़ाकडून पोलिसांनी हा ऐवज हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रितेश तारी, पोलीस हवालदार संतोष भाटकर, सचिन बांदेकर व गौरीष सातार्डेकर यांनी ही कारवाई केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.









