क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी वास्कोतील टिळक मैदानावर बलाढय़ नॉर्थईस्ट एफसीच्या आव्हानाला चेन्नईन एफसीला सामोरे जावे लागेल. चेन्नईन संघातील खेळाडू दुखापतग्रस्त असून त्यांच्याविरूद्ध अपराजित मालिका वाढविण्याचा नॉर्थईस्टचा निर्धार असेल.
गुणतक्त्यात नॉर्थईस्ट युनायटेड संघ 9 गुणांनी तिसऱया स्थानावर आहे. प्रांरभी आघाडी घेतलेल्या संघांमध्ये त्यांचा समावेश आहे. दोन विजय आणि तीन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांच्याबरोबर आयएसएलमध्ये हैदराबाद एफसी आणि बेंगलोर एफसी हे इतर दोन संघही अपराजित आहेत.
नॉर्थईस्ट युनायटेड आणि चेन्नईन एफसी यांच्यात आयएसएलमध्ये आतापर्यंत 12 सामने झाले असून यात सहा विजय आणि तीन बरोबरी अशा कामगिरीसह नॉर्थईस्ट आघाडीवर आहेत, त्यामुळे जेरार्ड न्यूस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्चस्व वाढविण्याचा नॉर्थईस्टचा निर्धार असेल.
दुसरीकडे चेन्नईनला सलग दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. चार सामन्यांतून तेवढेच गुण अशी त्यांची कामगिरी आहे. दोन वेळा आयएसएलचे जेतेपद मिळविलेल्या या संघासाठी जमेच्या बऱयाच बाजू आहेत. सर्व प्रतिस्पर्ध्यांसाठी ते नेहमीच धोकादायक ठरले आहेत. चेन्नईनचा संघ मुंबई सिटीविरूद्धच्या पराभवातून सावरेल अशी न्यूस यांची अपेक्षा आहे. मुंबईविरूद्ध अखेरच्या क्षणापर्यंत चेन्नईनने झुंजार खेळ केला होता.
मागील सामन्यात आम्हाला अपेक्षित निकाल मिळाला नाही, पण त्यांनी गोलच्या संधी निर्माण केल्या. प्रतिस्पर्ध्यासाठी ते धोकादायक होते. निष्ठेने, आक्रमकपणे आणि चुरशीने खेळणाऱया संघाशी गाठ पडणार असल्याच्या अपेक्षेने आम्ही मैदानावर उतरू. आम्हाला त्यासाठी सज्ज व्हावे लागेल. पूर्ण 90 मीनटे आम्हाला एकाग्रता राखावी लागेल.. सातत्याच्या या बाबतील आम्हाला हे करण्याची गरज असल्याचे न्यूस म्हणाले.
नॉर्थईस्टने यंदा सर्वाधिक गोलांच्या बाबतीत मुंबई सिटीच्या साथीत संयुक्त आघाडी घेतली आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 गोल केले आहेत. बचावातही नॉर्थईस्टने प्रतिस्पर्ध्यासाठी खडतर स्थिती निर्माण केली असून, त्यांनी दोन सामन्यांत क्लीन शीट राखली आहे. दुखापतींच्या काही समस्या असल्या तरी आपला संघ खडतर आव्हान निर्माण करेल अशी लॅसझ्लो यांना अपेक्षा आहे. नॉर्थईस्ट अपराजित मालिका कायम राखण्यास आतूर असून चेन्नईन पुनरागमन करण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. त्यामुळे या लढतीत खूप काही पणास लागलेले असेल.









