प्रतिनिधी / वास्को
उद्या रविवार दि. 26 रोजी दुपारी वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला प्रारंभ होणार आहे. सप्ताह उत्सव समितीच्या मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेवून 24 तासांच्या साखळी भजन सप्ताहाला प्रारंभ होईल. मात्र, हे भजन ध्वनीफितीव्दारे सादर करण्यात येईल. सप्ताह उत्सवातील अन्य कोणतेही कार्यक्रम यंदा होणार नाहीत.
दुसऱया दिवशी समाप्तीचा कार्यक्रमही थोडक्यात होणार आहे. सप्ताह काळात मंदिर खुले असेल परंतु भाविकांना देवदर्शन घेता येणार नाही. भाविकांना दामोदर देवाचे दर्शन घर बसल्या व्हावे यासाठी यू टय़ुब व इतर इलेक्ट्रोनिक माध्यमांतून लिंक जोडून पाहण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच शनिवारी सायंकाळी 7.30 वा. घर बसल्या गायनाचा आस्वाद घेण्यासाठी युटय़ूबद्वारे विशेष मैफीलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोरोना संकटामुळे यंदा भाविकांना देवदर्शन घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांनी घरीच राहून देवदर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर यांनी केले आहे.
मंदिराभोवती यंदा पत्र्यांचे कुंपण, पोलिसांनी केली पाहणी
दरम्यान, वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे, मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद बुगडे, पोलिकेचे निरीक्षक महेश कुडाळकर, व उत्सव समितीचे सदस्य शेखर कळंगुटकर, प्रशांत लोटलीकर व इतर अधिकाऱयांनी दामोदर मंदिराच्या ठिकाणी करण्यात येणाऱया सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. मंदिराच्या चारही बाजुनी पत्र्यांचे कुंपण उभारून मंदिराकडे कुणी जाऊ नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे. मंदिर परिसरात सुरक्षेसाठी आयआरबी पोलिसांचा बंदोबस्त असेल. दोन दिवस शहरातील स्वातंत्र्य पथ मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध येणार आहेत.
नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांचे आवाहन दरम्यान, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनीही यंदा भजनी सप्ताह उत्सव कोणत्याही प्रकारची गर्दी न करता साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याने भाविकांनी घरीच राहून देवाचे नामस्मरण करावे, कोरोनाच्या संकटातून समाजाला मुक्त करण्याचे मागणे देव दामोदराकडे करावे असे आवाहन केले आहे.









