तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पोलीस खात्यात नोकरी करताना बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक व्यवसायास प्रोत्साहन देणे, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणारे पोलीस शिपाई विकी सुभाष गायकवाड यास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि सेवेतून बडतर्फ केले आहे. या कारवाईमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
विकी सुभाष गायकवाड याचा गुन्हेगारी कृत्यामधील असलेल्या सक्रिय सहभागाबद्दल व सन २०१४ मध्ये त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. त्यावेळेस कर्तव्य बजावताना शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याजवळ जाऊन लाईनमध्ये लावलेला वाळूचा ट्रक सोडून देणे. पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरणे, शिवीगाळ करणे, कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गच्ची धरुन जनमानसात पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होईल, असे वर्तन केले. तसेच २०१२-१३ मध्ये देखील आयटीआय पोलीस चौकी येथे जाऊन ‘माझी वाळूची गाडी का पकडले, आपण कोण आहोत हे तुम्हाला माहित नाही का?, अशी एकेरी व अरेरावीची भाषा वापरत पोलीस उपनिरीक्षकांशी बेशिस्त व उद्धटपणे वर्तन केले. त्यांचे हे कृत्य लोकहितास बाधा पोचणारी असल्याने, पोलीस कर्मचारी म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य लक्षात घेता विकी गायकवाड यास पोलिस सेवेत ठेवणे इष्ट ठरणार नाही. म्हणून पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.









