शिवसेनेची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी : दि.२९ रोजी रास्तारोको : पोलीसांकडून टाळाटाळ
प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा येथील तीन वर्षीय मनन सुशांत वाजे या बालकाचा एकाने घातपात केला असून पोलीस कसलीच दाद घेत नाहीत, त्यामुळे मननचे वडील सुशांत यांनी शिवसेनेकडे धाव घेतली असून या प्रकरणाचा छडा लावावा, अन्यथा दि.२९ नोव्हेंबर रोजी पेठ-सांगली रस्त्यावर प्रशासकीय इमारती समोर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख व नगरसेवक शकील सय्यद यांनी निवेदनाव्दारे प्रांताधिकारी संपत खिलारी यांना दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मनन हा दि.२७ जून २०२१ पासून आई प्राची हिच्या समवेत बेपत्ता होता. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. दरम्यान सुशांत वाझे हे पत्नी व मुलाचा शोध घेत असताना त्यांना दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी निनावी फोनवरुन मनन याचा बिळाशी(ता.शिराळा) येथे संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजले. दि. ७ रोजी पोलीस उपाधिक्षक यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सूचीत केले. आष्टा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी कोकरुड पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यास सांगितले. वाजे हे कोकरुडला गेले असता, तेथील पोलीसांनी शिराळा पोलीस ठाण्याकडे बोट दाखवले. दखल न घेतल्याने वाजे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस उपाधिक्षक, व आष्टा, कोकरुड पोलीस ठाणे रजिस्टर पोस्टाने लेखी तक्रार पाठवली. या मुलाचा घातपात केलेल्या व्यक्तीचे नाव ही शिवसेनेने निवेदनात टाकले आहे. या मुलाचा
घातपात करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असून या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना अशोक चव्हाण, महमंद शेख, रामराव थोरात, फारुख तांबोळी, संदीप पवार, सुर्यकांत पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.









