प्रतिनिधी / इस्लामपूर
एक रक्कमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्हयात आक्रमक झाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊसांची वाहने रोखण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी बहे पुले परिसरात कृष्णा कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकातील हवा सोडून देण्यात आली. साखर कारखानदारांनी एफआरपीचा निर्णय तात्काळ घ्यावा, अन्यथा आंदोलन उग्र करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी दिला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील साखर कारखानदारांनी एकरक्कमी एफआरपी जाहीर केली. मात्र सांगली जिल्हयातील कारखानदार अजूनही गप्प आहेत. जिल्हयातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. ऊस तोडणी मजूर दाखल झाले आहेत. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. बुधवारी सायंकाळी कृष्णा कारखान्याच्या ऊस वाहतूक करणारी वाहने कार्यकर्त्यांनी रोखून धरली. दरम्यान ट्रॉलीच्या चाकातील हवा सोडून देण्यात आली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी
करत हे आंदोलन केले.
कोल्हापूर जिल्हयातील कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. त्याप्रमाणे सांगली जिल्हयातील कारखानदारांनी एफआरपी जाहीर करावी, जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत हानी टाळण्यासाठी ऊस वाहतूक बंद करावी, अशी मागणी यावेळी केली आहे.