अमेरिकेतील 50 लाख लोकांचे असणार वास्तव्य
तुमच्या स्वप्नातील शहर कसे असेल? एक शहर जेथे टोकियो सारखी स्वच्छता असावी, न्यूयॉर्कसारखे आलिशान जीवन असावे आणि स्टॉकहोमसारख्या सामाजिक सुविधा असाव्यात. अब्जाधीश उद्योजक मार्क लोर हे स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यांनी 50 लाख लोकसंख्या असलेल्या ‘अमेरिकेच्या एका शहरा’चे व्हिजन तयार केले असून याचे डिझाइन करण्याची जबाबदारी जगातील सर्वात प्रसिद्ध आर्किटेक्टला देण्यात आली होती.
पर्यावरणस्नेही शहर
हे शहर वसविण्यासाठी आता त्यांना जमीन आणि 400 अब्ज डॉलर्सच्या निधीची गरज आहे. वॉलमार्टच्या माजी अधिकाऱयाने मागील आठवडय़ात एक स्थायी शहर टेलोसा विषयक स्वतःच्या योजनांचा खुलासा केला आहे. हे शहर अमेरिकेतील एका वाळवंटात वसविण्याची योजना आहे. 1,50,000 एकरच्या या प्रकल्पात पर्यावरणस्नेही स्थापत्यकला, ऊर्जानिर्मिती आणि दुष्काळापासून मुक्त जलप्रणाली यासाख्या मूलभूत सुविधा असतील.
जागेचा शोध सुरू
‘15-मिनिट सिटी डिझाइन’ अंतर्गत रहिवासी केवळ 15 मिनिटांमध्ये स्वतःच्या घरापासून ऑफिस, शाळा आणि अन्य ठिकाणी पोहोचू शकणार आहे. प्रकल्प नियोजकांना शहर वसविता येईल अशा जागेचा शोध आहे. नेवादा, यूटा, इडाहो, एरिझोना, टेक्सास आणि एपलाचियन येथील जागेची निवड होऊ शकते. लोर यांनी या शहराचे डिझाइन करण्यासाठी आर्क्टिटेक्चर फर्म बिगची निवड केली आहे.
निवासी संकुल अन् हिरवाई
कंपनीने डिजिटल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शहराचा नकाशा दाखविला आहे. यात निवासी संकुल, हिरवे आच्छादन आणि खुल्या जागांवर काही रहिवाशांना व्हर्च्युअली पद्धतीने दर्शविण्यात आले आहे. शहरात जीवाश्म इंधनाने चालविणाऱया वाहनांवर बंदी असेल.









