जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन समितीची बैठक; शासनाच्या मार्गदर्शनानुसार 8 वी ते 10 वी पर्यंत सुरू करण्याच्या सूचना
प्रतिनिधी /वाळपई
जवाहर नवोदयाच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष देणार आहे. विद्यालयाच्या रस्त्याचे रुंदीकरण व विद्युतीकरण होणार आहे. या कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, असे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी स्पष्ट केले आहे.
वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या समस्या व इतर वेगवेगळय़ा विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला.
वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी सातत्याने पालक-शिक्षक संघाच्या समितीतर्फे केली जात आहे. याबाबतचे निवेदन सरकारला सादर केलेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे जमिनीचा विषय सरकारने त्वरित निकालात काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र त्या संदर्भात अजूनपर्यंत लक्ष देण्यात आलेले नाही. दरम्यान, विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी उपस्थिती लावून एकूण संपूर्ण समस्यांची सविस्तरपणे जाणीव करुन घेतली. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली जमीन संबंधीचा खटला सोडविण्याच्या दृष्टीने आपण प्राधान्याने लक्ष देणार, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
गोवा सरकारने नुकतीच आठवी ते दहावीपर्यंत शाळेचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. तसा आदेश आल्यास मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून शाळेचे वर्ग सुरू करण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी प्राचार्य व इतर शिक्षकांनी याच्या पूर्वतयारीवर जोर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. विद्यालयाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. याची दखल घेऊन सदर रस्त्याचे रुंदीकरण करून त्याठिकाणी पथदिपांची सोय करावी, अशी मागणी यापूर्वी पालकांच्या समितीतर्फे करण्यात आली होती. यासंदर्भाच्या कामाला लवकरच मंजुरी मिळून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी रॉय यांनी सांगितले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य, शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची खास उपस्थिती होती.









