दिल्लीतीलही 20 विद्यार्थी वाळपईत : व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे पालकांच्या चिंतेत वाढ
प्रतिनिधी / वाळपई
देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण होत असलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाचे पंधरा विद्यार्थी दिल्ली येथील जवाहर नवोदय विद्यालयात अडकले आहेत तर दिल्लीतील नवोदय विद्यालयाचे वीस विद्यार्थी वाळपईतील नवोदय विद्यालय अडकले आहेत. आपली मुले परराज्यात अडकल्याने पालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. गोवा सरकारने पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांची योग्य ती सोय करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
कोरोना नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले असून शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत वाळपईतील जवाहर नवोदय विद्यालयातील 15 विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार एका राज्यातील विद्यार्थ्यांना दुसऱया राज्यातील विद्यालयामध्ये शिक्षणासाठी पाठविण्यात येत असते. अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी वाळपई जवाहर नवोदय विद्यालयातील पंधरा मुलांना दिल्ली येथील विद्यालयात पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणे दिल्लीतील 20 विद्यार्थ्यांना वाळपईतील विद्यालयात पाठविण्यात आले होते. सध्या दोन्ही विद्यालयातील मुलांचे शिक्षण पूर्ण झाले असून दीड महिन्यापूर्वीच त्यांना आपापल्या विद्यालयात पाठविण्याची गरज होती मात्र लॉकडाऊनमुळे दळणवळणाची कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ही मुले अडकली आहेत.
विद्यालय प्रशासनाकडून निष्काळजीपणा
सध्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढत आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांना पूर्वीच्या विद्यालयात पाठविण्याची जबाबदारी संबंधित विद्यालयाच्या व्यवस्थापनाची आहे. परंतु, त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नसल्याचे समोर आले आहेत. काही पालकांनी वाळपईतील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना याबाबत विचारणा करून नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत अडकून पडले असताना प्राचार्यांनी त्यांना गोव्यात आणण्याच्यादृष्टीने काहीच हालचाली केल्या नसल्याचा आरोप पालकांनी केली आहे. यासंदर्भात पालक येत्या दोन दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहेत व त्यांना यासंदर्भात मदत करण्याची विनंती करणार आहेत.









