जिल्हाधिकारी अमित रॉय यांचे आश्वासन : जमीन वाद निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणार
वाळपई /प्रतिनिधी
पालक शिक्षक संघाने निवेदन सादर केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिकारी अमित रॉय यांनी जवाहर नवोदय विद्यालयाला भेट देऊन समस्यांसंदर्भात शिक्षकांशी सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत सभोवताली कुंपण नसल्यामुळे रानटी जनावरांचा उपद्रव वाढला असून तात्पुरती व्यवस्था म्हणून तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले आहे. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या विज्ञान वर्गासाठी येणाऱया शैक्षणिक वर्षापासून सुरुवात करण्यात येणार असून त्यासंदर्भातील पूर्वतयारी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी विद्यालयाच्या प्राचार्य व इतर शिक्षकांना दिलेले आहेत.
नवोदय विद्यालयाचे पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र गावस व पालक सुबोध देसाई यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करून या विद्यालयाच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या जमिनीच्या वादासंदर्भात सरकारकडे प्रयत्न करून हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती. या निवेदनाची त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी अमित रॉय यांनी गुरुवारी संध्याकाळी विद्यालयाला भेट देऊन एकूण सर्व परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य एस. बिंदू व इतर शिक्षकांशी त्यांनी सविस्तरपणे चर्चा केली. विद्यालयाच्या सभोवताली कुंपण नसल्याने रानटी जनावरांचा वावर वाढल्याने असुरक्षितता निर्माण झालेली आहे. याच्यावर तात्पुरता उपाय म्हणून तारेचे संरक्षण घालण्यासाठी लवकर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. सध्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी संरक्षण कुंपण उभारता येत नाही. मात्र रानटी जनावरांना थोपविण्यासाठी तारेचे कंपाउंड उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
येत्या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखा.
वाळपई जवाहर नवोदय विद्यालयामध्ये अकरावी वर्गासाठी विज्ञान शाखेची व्यवस्था नाही. यामुळे या विद्यालयातील मुलांना विज्ञान शाखेसाठी काणकोण या ठिकाणी जावे लागते. याठिकाणी विज्ञान शाखा सुरू झाल्यास विद्यालयाच्या पटसंख्येमध्ये वाढ होणार आहे. या संदर्भाचा मुद्दा प्राचार्य बिंदू यांनी उपस्थित केला असता जिल्हाधिकाऱयांनी सांगितले की, विद्यालयाच्या परिसरामध्ये नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेता येत नाही. कारण हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे अस्तित्वात असलेल्या इमारतीमध्ये प्रयोगशाळेची व्यवस्था करून येणाऱया शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखा सुरू करण्यासंदर्भात पूर्वतयारी करण्याचे आदेश त्यांनी शिक्षक व प्राचार्य यांना दिले. यासाठी आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामसभेमध्ये चला
दरम्यान विद्यालयात आवश्यक प्रमाणात पटसंख्या मिळत नाही. अनेक प्रयत्न करूनही दरवषी क्षमतेपेक्षा कमी मुले प्रवेश येत असल्याचा मुद्दा चर्चेला घेण्यात आला. यावेळी यावर उपाय सूचविताना जिल्हाधिकाऱयांनी सत्तरी तालुक्मयातील सर्व पंचायतीमध्ये आयोजित होत असलेल्या ग्रामसभेमध्ये शिक्षकांनी जाऊन विद्यालय संदर्भात सविस्तरपणे माहिती देण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी विद्यालयाच्या सभोवताली प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.









