तहसीलदारांना निवेदन : खानापुरात वाल्मिकी जयंती उत्साहात
प्रतिनिधी / खानापूर
कर्नाटकातील वाल्मिकी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने व शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात अत्यंत कमी सवलती मिळत आहेत. यामुळे लोकसंख्येच्या मानाने सवलतीच्या टक्केवारीत वाढ करावी, अशा मागणीचे निवेदन अखिल कर्नाटक वाल्मिकी समाजाच्यावतीने तालुका अध्यक्ष यल्लाप्पा कानेर यांनी खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना सादर केले. खानापुरात वाल्मिकी जयंती उत्सव तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सदर निवेदन देण्यात
आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, वाल्मिकी समाजाने राज्य शासनाकडे यासंदर्भात बऱयाचवेळा निवेदन देऊन मागणी केली आहे. यांसदर्भात वाल्मिकी पिठाचे स्वामीजी जगद्गुरु श्री वाल्मिकी प्रसन्नानंद महाराज यांनी पदयात्रा काढून राज्य शासनाला निवेदन सादर केले आहे. या निवेदनाची दखल घेऊन राज्य शासनाने यासंदर्भात अभ्यास करून अहवाल देण्यासाठी न्यायमूर्ती नागमोहन दास आयोगाची स्थापना केली होती. त्या आयोगानेही यासंदर्भात आपला अहवाल सादर केला असून त्या अहवालातील शिफारशी वाल्मिकी समाजातील शिक्षण घेणाऱया विद्यार्थी वर्गाला तसेच निरुद्योगाना लागू कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी यल्लाप्पा कानेर यांच्यासमेवत एन. सी. तळवार, हणमंत वक्कूंद, करविर दोडवाड, शानूर गुडलार, मारुती छोटण्णावर, श्रीधर बळगार, हणमंत हळसगी, हणमंत नायक, फकिराप्पा बाळण्णावर तसेच समाजबांधव उपस्थित होते.









