प्रतिनिधी /म्हापसा
अन्साभाट-म्हापसा येथील वालावलकर कुटुंबियांतर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणाऱया श्रावणी शनिवार उत्सवाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. धर्मा बाबुसो वालावलकर यांनी शंभर वर्षापूर्वी श्रावणी शनिवार उत्सवाची प्रथा सुरू केली होती. म्हापसा व परिसरात श्री शनी महाराजांचे एकही मंदिर नसल्याने भाविक या दिवशी मोठय़ा संख्येने वालावलकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन शनी देवाच्या पारायण व निरूपणाला येऊन शनी देवाचे दर्शन घेतात व देवाला तेल, उदबत्ती, फुले वाहून आपली सेवा रूजू करतात.
धर्मा वालावलकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे संजय महाबळेश्वर वालावलकर गेली पंचवीस वर्षे उत्सवाची धुरा वाहत आहेत. गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे भाविकांची वर्दळ कमी झाली असली तरी उत्सवाला कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. या उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे आजपर्यंत नाना शिरगावकर, वसंतराव काडणेकर, गोविंदराव वेर्लेकर, वामनराव पिळगावकर, गोपिनाथ वाळके, डॉ. राजू पेडणेकर, डॉ. कवळेकर, विठ्ठल वाळके आदी नामांकीत भजनी कलाकारांनी भजनाच्या कार्यक्रमात सहभाग दर्शविला आहे.









