प्रतिनिधी /मडगाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांची कन्या वालांका आलेमाव यांनी नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू केले आहे. रविवारी त्यांनी डोंगरी-नावेली येथे एक जाहीर सभा घेऊन आपण नावेलीतून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. या सभेला चर्चिल आलेमाव उपस्थित होते.
आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार की, राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार हे वालांका आलेमाव यांनी स्पष्ट केले नाही. आपण, नावेलीतून निवडणुकीत उतरणार असून नावेलीच्या लोकांनी आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी की राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर याचा निर्णय आपले वडिल चर्चिल आलेमाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने, सद्या ही जागा खाली झालेली आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक होणार नसली तरी इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली असून त्यात वालांका आलेमाव यांनी पहिली जाहीर सभा घेऊन आपले इरादे स्पष्ट केले आहे.
चर्चिल आलेमाव हे 2007च्या निवडणुकीत नावेली मतदारसंघातून विजयी झाले होते. तेव्हा पासून आलेमाव कुटुंबिय नावेली मतदारसंघाकडे जोडले गेले आहेत. नावेलीच्या लोकांनी आम्हाला नेहमीच चांगला पाठिंबा दिलेला आहे. असाच पाठिंबा आपल्याला विधानसभा निवडणुकीत मिळणार असल्याचा विश्वास वालांकाने यावेळी बोलताना व्यक्त केला.
मुलीला एक संधी द्या…
चर्चिल आलेमाव यावेळी बोलताना आपल्या मुलीला समाजसेवेची इच्छा असून राजकारण्यात उतरून त्यांना अधिक प्रभावीपणे समाजसेवेची संधी द्यावी असे आवाहन चर्चिल आलेमाव यांनी यावेळी बोलताना केले. आपल्याला जसे नावेलीच्या मतदारांनी प्रेम दिले होते, तसेच प्रेम आपल्या मुलीला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ते काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जातात, त्यामुळे वालांका आलेमाव यांना राष्टवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात युती झाली तर चर्चिल आलेमाव आपल्या कन्येसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.









