पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमध्ये बांधकाम होत असलेला एक ब्रिज अचानक कोसळला आहे. त्याचे कारण विचारले असता तो जोरदार वाऱयामुळे पडला असावा, असे उत्तर ऐकून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी अक्षरशः थंडगार पडले. ही घटना सोमवारची आहे. या ब्रिजचा एक भाग 29 एप्रिलला कोसळला होता.
ब्रिज पडल्याचे वृत्त नितीन गडकरी यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी आपल्या सचिवाला ब्रिज पडल्याच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सोपविले. त्यांनी चौकशी करुन जे कारण सांगितले त्यामुळे गडकरी आश्चर्यचकित झाले. हा ब्रिज जोरदार वारे आणि धुके यामुळे पडला असावा, असे सचिवांनी स्पष्ट केले. हे सचिव आयएएस अधिकारी आहेत. स्वतः नितीन गडकरी यांनीच ही घटना एका कार्यक्रमात सर्वांसमोर उघड केली. एक आयएएस अधिकारी अशा प्रकारच्या माहितीवर कसा विश्वास ठेवतो, याचे आपल्याला वैशम्य वाटल्यावाचून राहिले नाही, अशी टिप्पणीही नितीन गडकरी यांनी केली. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
बांधकामात चूक
कोणत्याही ब्रिज वाऱयाने पडला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हा ब्रिज बांधकामात झालेल्या चुकीमुळेच पडला असला पाहिजे. बांधकामाची जबाबदारी असणाऱया अधिकाऱयांनी तो का पडला याची सखोल चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
खर्च कमी होणे आवश्यक
सार्वजनिक बांधकामे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, पण कमी खर्चात करणे आवश्यक आहे. बांधकाम खर्च वाढल्यास अशी बांधकामे अर्थिकदृष्टय़ा तोटय़ाची ठरतात. बांधकाम खर्च कमी झाल्यास मात्र, तेवढय़ाच खर्चात जास्त बांधकामे करता येतात, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.