वारणानगर / प्रतिनिधी
शासकीय यंत्रणा सर्वच पातळीवर राबत असून माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान प्रत्येकाने हाती घेवून समाजाप्रती असणारी जबाबदारी पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी करून राज्य शासनाने जाहीर केल्यानूसार वारणा साखर कारखान्याने कोरोना केअर सेंटर सुरू केले ही अभिमानास्पद बाब आहे. असे गौरवोद्गार काढले.
वारणानगर ता. पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्यावतीने शंभर बेडच्या डॉ.विनय कोरे कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आ. डॉ. विनय कोरे होते. वारणा शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सायन्स पार्क जवळील इमारतीत हे सेंटर शुक्रवारपासून सुरु झाले.पहिल्याच दिवशी आठ पेशंट उपचासाठी दाखल झाले.
जिल्हाधिकारी डॉ. देसाई म्हणाले जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात तीन लाखांवर लोक मुंबईसह इतर जिल्ह्यातून आले होते. कोरोना महामारीचे गांभीर्य कोल्हापूरने लक्षात घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणावर रोखण्यात यश आले अन्यथा या काळात मोठा उद्रेक निर्माण झाला असता. येणाऱ्या काळात संसर्ग कमी करणे, प्रत्येकाने मास्क व सोशल डिस्टन्सींगचा वापर करणे, स्वच्छेतेचे पालन या बाबींची पूर्तता करून गावोगावी सुरू केलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानास जनतेने सहकार्य करावे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आम.कोरे यांनी कोरोनाचे संकट लस उपलब्ध झाल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या जीवनावर फटका बसला आहे. आर्थिक व रोगाच्या भीतीने अनेक नागरीक घरातून हॉस्पीटलमध्ये जात नाहीत प्रसंगी अनेकांना आपला जीव गमवावा लागला.कोरोनाचा संसर्ग घरा-घरांपर्यंत पोहचला आहे याचे गांभिर्य ओळखून संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहीजे.कोरोना महामारीचे संकट प्रत्येकाच्या जीवनातून निघून जावावे यासाठी कोरोनाला लढा देण्यासाठी प्रत्येक कुटुंबांने आपली जबाबदारी पार पाडावी असे कोरे यांनी सांगितले.
व्यासपीठावर जनसुराज्यशक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम,प्रांताधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे, राज्य सहकार बोर्डाचे अध्यक्ष डॉ.प्रतापराव पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.आर.भगत, पन्हाळ्याच्या सभापती तेजस्वीनी शिंदे, वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम,अशोकराव माने, माजी सभापती विशांत महापुरे,विजयसिंह माने, प्राचार्य डॉ.एस.व्ही. आणेकर,प्राचार्य बी.व्ही.बिराजदार यांच्यासह वारणा उद्योग व शिक्षण समुहातील सर्व संचालक, पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
वारणा बँकेचे संचालक डॉ.प्रशांत जमने यांनी प्रास्ताविक केले.प्रा.जे.के.शिंदे, प्रा.नामदेव चोपडे व विकास चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.जनसुराज्याचे सरचिटणीस व प्रवक्ते अॅड.राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.
Previous Articleखंडणी मागणाऱ्या तीघांवर वाई पोलिसात गुन्हा दाखल
Next Article सांगलीत 497 नवे रुग्ण तर 685 जण कोरोनामुक्त









