शाहुवाडी / प्रतिनिधी
हारुगडेवाडी (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतील चांभार डोह परिसरात वारणा नदीच्या पात्रात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. प्रविण गणपती दिंडे (वय ४३, रा. कोकरुड पैकी माळेवाडी, ता.शिराळा) असे त्या व्यक्तिचे नाव आहे. सदर व्यक्ती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची फिर्याद कोकरूड पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.
नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू असताना हारुगडेवाडी गावच्या हद्दीतील चांभार डोह परिसरात वारणा नदी काठी पाण्यामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता मृतदेह आढळून आला. यावेळी बेपत्ता प्रविण दिंडे याचाच मृतदेह असल्याची खात्री करून आनंदा गणपती दिंडे (वय ४०, कोकरुड पैकी माळेवाडी, ता.शिराळा) यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली. रात्री उशिरा मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पंचनामा व शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीसांत बुडून मयत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. अं.माने अधिक तपास करीत आहेत.









