प्रतिनिधी / घुणकी
वारणा नदीवरील चावरे-घुणकीच्या बंधाऱ्यावरुन पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतल्यानंतर येथील युवक बुडाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. आज सायंकाळी मृतदेह वारणानदीत मिळाला. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. विजय भिमराव शिंदे (वय.२५ रा.घुणकी) असे युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरुन व पोलीसातून मिळालेली माहिती अशी की घुणकी येथील विजय शिंदे हा युवक मंगळवारी (ता.१८) दुपारी जनावरांच्या गोठ्यात सुरु असलेले काम संपवूनमित्रांसोबत सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणा नदीच्या चावरे-घुणकी हद्दीतील बंधाऱ्यावर पोहण्यास गेले. नदीला पाणी भरपूर असल्याने बंधाऱ्यातून मोठा प्रवाह सुरू आहे. याच ठिकाणी सर्वजन पोहत होते. विजयने बंधाऱ्यावरुन उडी मारल्यानंतर तो प्रवाहातून वर आला नसल्याचे मित्रानी सांगितले. पोलिसांसह नातेवाईकांनी तपास केला.
बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनचे सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शुभम काटकर, सिध्दार्थ पाटील, सतिश पाटील, पृथ्वीराज पाटील, रोहित जाधव यांच्या पथकानेपेठवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, फौजदार खान, काँस्टे नरसिंह कुंभार, कॅा. रेणुसे, पोलीस पाटील संदीप तेली, तलाठी प्रशांत काळे, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्यातून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वारणा नदीत तपास केला. परंतु मृतदेह मिळाला नाही. दरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास बंधाऱ्यानजीक मृतदेह तरंगताना आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
विजय शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत व त्याचा भाऊ अजय वर्धा येथील पथकर नाक्यावर नोकरीस होते. ते लाँकडाऊन पासून घरी होते. ते दोघेही जनावरांच्या गोठ्याची दुरुस्ती करीत होते. त्यांच्या वडिलांचेही चौदा वर्षांपूर्वी छत्र हरपले आहे. परिस्थिती गरीबीची आहे.विजयच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई,भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबासाहेब दुकाने व जावेद रोटीवाले करीत आहेत.