संचालक मंडळात नवीन ७ चेहऱ्यांना संधी
वारणानगर / प्रतिनिधी
वारणानगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या सन-२०२१ ते २०२६ यासालासाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी सलग ७ व्यांदा निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या कार्यस्थळावर सोमवारी दुपारी एक वाजता बोलविलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले यांनी २१ जागासाठी २१ जणांचे अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणुक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांचे उत्पादक सभासद असलेल्या वारणा दूध संघ या मल्टीस्टेट संस्थेच्या २१ जागेसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. वारणा समुहाचे नेते आमदार डॉ.विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाची ही निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. एकवीस जणांच्या संचालक मंडळात सात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
यावेळी सभेत बिनविरोध निवड झालेले आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह नूतन सर्व संचालकांना निवडणूक निर्णय अधिकारी अरूण चौगले यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले यानंतर आम. कोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचीत संचालकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
आमदार डॉ. कोरे म्हणाले, संघाच्या निवडणुकीसाठी एकही विरोधात अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे ही ऐतिहासिक निवडणूक झाली. गतवेळच्या निवडणुकीत संघ आर्थिक अडचणीत असताना मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालो. या पाच वर्षाच्या काळात अनेक आवाहनांना सामोरे जावे लागले. संघाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासद, ग्राहक, कर्मचारी यासह सर्वांनी संघाला साथ दिली. तसेच दोन वर्षात ७२ कोटींच्या नव्या विस्तार योजना राबविल्याने त्याचा फायदा देखील संघाला झाला.
येत्या दोन वर्षामध्ये वारणा दूध संघ कर्जमुक्त होणार आहे. वारणा दुध संघ,कॅडबरी प्रकल्पात नव्याने विस्तार तसेच कार्यक्षेत्रासह साडेसात लाख दुधाचे संकलन करण्याचे उदीष्ठ आणि नवी विक्री व्यवस्था यावर संघाने भर दिली आहे असेही आमदार कोरे यांनी सांगितले. निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सर्व दूध उत्पादक सभासद, शेतकरी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले असून सभासदांनी पुन्हा एकदा संघावरील विश्वास संपादन करून आम्हां सर्वांनाच पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची संधी दिली त्याबदद्ल सर्व सभासदांचे आभार कोरे यांनी मानले.









