अक्रूर द्वारकेतून निघून गेल्यावर द्वारकेत एका पाठोपाठ एक विघ्ने येऊ लागली.
शारीर विघ्नें परोपरी । विविध ज्वर सीतें शारिं ।
वातपित्तकफविकारिं । द्वारकापुरिं जनक्लेशी ।
चिंता हृद्रोग संताप । तिरस्कार विषाद कोप ।
मानसविघ्नांचा प्रताप । नाना विकल्प संचरले ।
विघ्नें दैविकें दारुण । प्रयत्न होती लाभशून्य ।
उल्कापात विद्युत्पतम । अवर्षण दुर्वृष्टि ।
भौतिकें विघ्नें प्रकट जालीं । सर्पवृश्चिकभयें उठिलीं ।
नगरिं श्वानें पिसाळलीं । कलहाथिलें मार्जारें ।
महिष भांडती चौबारां । अजा अविकां गोधना वारा ।
क्षोभ श्वापदां व्याघ्रादि हिंस्रां । महाभेदरा पुरगर्भीं ।
द्वारकेत उद्भवलेल्या विघ्नांची एक यादीच कृष्णदयार्णव देतात. लोकांना विविध आजारांनी छळले. वेगवेगळय़ा प्रकारच्या तापांनी शरीर पोळले. हिवतापाने हुडहुडी भरली. वात, कफ, पित्त यांचे शरीरात असंतुलन होऊन विविध आजार उद्भवले. चिंता, हृद्रोग, संताप, तिरस्कार, विषाद, कोप असे मानसिक विकार बळावले. विविध दैवी विघ्ने निर्माण झाली. प्रयत्न करूनही व्यापाऱयांना व्यापारात फायदा होईना. व्यापार बुडाले. उल्कापात झाले. विजा पडून नुकसान झाले. काही काळ दुष्काळ तर काही काळ अती वृष्टीने शेती संपली. सर्प विंचू सर्वत्र फिरू लागले. नगरातली कुत्री पिसावली व चावू लागली. मांजरे भांडू लागली. वाघासारखे हिंस्त्र पशू लोकांवर अचानक हल्ले करू लागले.
वारंवार दुखणीं बहाणीं । वारंवार बहुधा विघ्नी ।
द्वारकेमाजि हे जाचणी । होतां वचनीं जन तर्की ।
अहो अक्रूर येथूनि गेला । तैंहूनि विघ्ना उदय जाला ।
अनिष्टांचा पूर पेटला । प्रलय मांडला पुरौकसां ।
ऐसें प्राचीन एक ऋषि । वाखाणिती त्यां शुकेन्द दूषी । इये श्लोकीं तें परिसावयासी । श्रोतयांसी हे सूचना।
वारंवार लोकांना दुखणी होऊ लागली. वारंवार अनेक विघ्ने येऊ लागली. त्यावेळी लोक म्हणू लागले-द्वारकेतून अक्रूर निघून गेल्यानेच ही विविध विघ्ने निर्माण झाली आहेत. अरिष्टांचा पूर आला आहे. महामुनी शुकदेव म्हणतात-असे वर्णन एका प्राचीन ऋषीने केले आहे. त्याला शुकदेवांनी दूषण दिले आहे.
भो भो राया प्राचीनऋषि । विसरोनि श्रीकृष्णगरिमेसी । अक्रूर गेलिया द्वारकेसी । विघ्नें ऐसीं जे वदले ।
तयांसि दूषण त्यांचेनि बोलें । कृष्णमहिमा विसरूनि गेले ।
म्हणोन अक्रूरा प्रशंसिलें । विघ्नबाहुल्यें वदोनियां ।
अक्रूर कृतवर्म्याच्या उक्ति । शतधन्व्याची निराकृति । तें पूर्वील व्याख्यान विसरोनि पुढती । वाखाणिती अनारिसें।
कृष्ण असतां द्वारकेआंत । अक्रूर गेलिया महोत्पात ।
हेंचि व्याख्यान असंमत । काय निमित्त तें ऐका ।
सकळ कल्याणाच्या श्रेणी । तपोधनांच्या आशीर्वचनीं ।
त्या मुनींचा वास सदैव कृष्णी । तो द्वारकाभुवनीं हरि असतां । कैसें अरिष्टदर्शन घडे । हें बोलणेंचि अवघें कुडें । अक्रूर मात्र गेलिया पुढें । कीं गरिमा उडे कृष्णाची । स्फुलिङ्गे वीण अग्निचि वृथा । कीं तरंगेंवीण सागर रिता । तेंवि अक्रूरें वीण कृष्णसामर्थ्या । आली न्यूनता म्हणो ये ।
देवदत्त परुळेकर








