संशयिताला अटक, खून करून मृतदेह विहिरीत फेकला
प्रतिनिधी /पेडणे
वायडोंगर पार्से येथे एका कामगाराचा मृतदेह विहिरीत असल्याचे रविवार दि. 30 रोजी सकाळी निदर्शनास आले. सदर घटनेचा पेडणे पोलिसांनी तपास केल्यानंतर खून झाल्याचे उघडकीस आले. सदर कामगाराचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला होता. पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी मुख्य संशयिताला सहा तासाच्या आत सुर्ला येथून अटक केली. या कामगारारचा खून का करण्यात आला, या विषयी पोलीस तपास करत आहेत.
पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी माहिती देताना वायडोंगर पार्से येथील अनिता पेटकर यांच्या घराची व इतर कामाची देखरेख करण्यासाठी संतोष नामक व्यक्ती कामाला होती. त्याचा 29 रोजी निर्घुणपणे खून करून मृतदेह विहिरीत टाकला होता. घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही धागेदोरे मिळतात काय त्याचा तपास केला असता अनिता पेटकर यांच्या घर व इतर कामाची देखरेख करण्यासाठी सुर्ला येथील अनिल झाटय़े हा कामाला होता. त्या दिशेने पोलिसांनी तपास करूक सहा तासाच्या आत मुख्य संशयिताला अटक केली.
घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी पेडणे अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पेडणे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
मयताचे नाव संतोष असून तो एका दूध व्यावसायिकाच्या गोठय़ात वास्तव करून राहत होता. त्याचे वय अंदाजे 55 ते 60 च्या दरम्यान आहे. अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, चालक प्रमोद गवंडी, जवान अमोल परब, जवान राजेश परब, जवान अमित सावळ यांनी मृतदेह काढण्यात महत्वाची भूमिका बजावली.
मयत संतोष नामक व्यक्ती कुठली त्याचा पोलीस तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस पुढील तपास करत आहेत. शवचिकित्सा करण्यासाठी मृतदेह गोवा वैद्यकीय इस्पितळ बांबोळी येते पाठवण्यात आला आहे.









