कालडी ते काशी शांकर एकात्मता पदयात्रा
प्रतिनिधी /फोंडा
श्री संस्थान शांताश्रम हळदीपूर मठाचे मठाधीश प. पू. वामनाश्रम स्वामीजींनी सुरु केलेल्या कालडी केरळ ते काशी या ‘शांकर एकात्मता पदयात्रे’चे बुधवार 16 नोव्हेबर रोजी गोव्यात आगमन होणार आहे. या पदयात्रे दरम्यान 16 ते 24 दरम्यान गोव्यातील विविध ठिकाणी स्वामीजींचे भव्य स्वागत होणार आहे. काशी येथील जुन्या मठाचे पुर्ननिर्माण व सामाजिक एकात्मता या दोन मुख्य उद्देशाने स्वामीजींनी या पदयात्रेचे प्रयोजन केल्याची माहिती श्री संस्थान शांताश्रम मठाचे ट्रस्टी अध्यक्ष सुमित वेरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैश्य कुलगुरु परंपरेतील मूळ मठ वाराणसी येथील काशी क्षेत्रात आहे. मुगलांच्या भारतावरील आक्रमणाच्यावेळी मठाच्या पूर्व स्वामींनी दक्षिण भारतात स्थलांतर केले व गोकर्णनजीक हळदीपूर याठिकाणी मठाची उभारणी केली. मात्र वाराणसी काशी क्षेत्रातील मूळ मठ तेथेच आहे. या मठाचे पुर्ननिर्माण करण्याच्या संकल्पनेतून वामनाश्रम स्वामींनी शांकर एकात्मता पदयात्रा सुरु केली आहे. जगद्गुरु आदी शंकराचार्यांची जन्मभूमी असलेल्या केरळ राज्यातील कोचीन जवळील कालडी येथून वामनाश्रम स्वामींजींनी विजयादशमीच्या मुहूर्तावर 5 ऑक्टोबर पासून या पदयात्रेला सुरुवात केली आहे. या पदयात्रीची सांगता येत्या 23 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभदिवशी महापुण्य क्षेत्र काशी येथे होणार आहे.
एकात्मता पदयात्रे दरम्यान स्वामीजी दर दिवशी 20 कि. मीटर पदभ्रमण करीत असून कालडी ते काशी हे साडेतीन हजार किलोमीटरचे अंतर ते पार करणार आहेत. येत्या 16 नोव्हें. रोजी कारवारमार्गे काणकोण येथे स्वामीजींचे आगमन होईल. त्यानंतर 17 रोजी फातर्पा, 18 रोजी मडगाव, 19 रोजी वरचा बाजार फोंडा येथील श्री विठोबा मंदिर, 20 रोजी माशेल, 21 रोजी साखळी, 22 रोजी डिचोली, 23 रोजी दत्तवाडी म्हापसा, 24 रोजी पेडणे असा गोव्यातील त्यांचा प्रवास असेल. या काळात गोव्यातील सर्व नियोजित ठिकाणी स्वामीजींचे भव्य स्वागत होणार असल्याची माहिती सुमित वेरेकर यांनी दिली. 25 रोजी स्वामीजे महाराष्ट्रातून पुढील पदयात्रेला प्रस्थान करणार आहेत. हळदीपूर मठाच्या इतिहासातील ही अपूर्व घटना असल्याचे वेरेकर यांनी सांगितले. वैश्य बांधवांसह अन्य सर्व हिंदू बांधवांनी स्वामीजींच्या स्वागत कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.









