मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने वानखेडे स्टेडियममधील नॉर्थ स्टॅन्डवरील तीन ब्लॉक्सना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात ऍपेक्स कौन्सिलचे सदस्य नदिम मेमन यांनी या महिन्याच्या प्रारंभी प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या या प्रस्तावाला बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली. वेंगसरकर हे माजी राष्ट्रीय निवड समिती प्रमुखही होते. त्यांनी 1976 ते 1992 या कालावधीत 116 कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सलग तीन कसोटीत शतक झळकवण्याचा दुर्मीळ पराक्रम त्यांच्या नावावर नोंद आहे. त्यांनी एकूण 6868 धावा जमविल्या असून त्यात 17 शतकांचा समावेश आहे.
याशिवाय 129 वनडेमध्ये त्यांनी 3508 धावा जमविल्या आहेत. 2001 ते 2017 या कालावधीत त्यांनी एमसीएचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे.









