ऑनलाईन टीम / मुंबई :
एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना ठाकरे सरकारने आणखी एक दणका दिला आहे. जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन मद्यविक्रीचा परवाना घेतल्याप्रकरणी वानखेडेंवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांचे 1996-97 मध्ये वय 18 पेक्षा कमी असतानाही त्यांनी नवी मुंबईतील सदगुरू बार आणि रेस्टॉरंटच्या करारनाम्यात आपलं वय लपवलं होतं. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आता ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतल्या वाशी येथे एक बार आहे. या बारसाठी 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना देण्यात आला होता. त्यावेळी वानखेडेंचे वय 17 वर्ष होते. यावरुनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. वयाच्या 17 व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र, या हॉटेल्स आणि बारच्या परवान्यामध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








