प्रतिनिधी /महाबळेश्वर :
एस बँक घोटाळयातील आरोपी वाधवान बंधु व त्यांचे कुटूंबियांचा पाचगणी येथील इन्स्टिटयुशनल क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांना पुढील 14 दिवसांसाठी पोलीस बंदोबस्तात महाबळेश्वर येथील वाधवान यांच्या मालकीच्या ‘दिवान विला’ या बंगल्यात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ‘तरुण भारत’ने गुरुवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध करुन होम क्वारंटाईनबाबतचा अंदाज वर्तवला होता. तो आज अचूक ठरला. इन्स्टिटयुशनल क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर वाधवान यांचा मुक्कम कोठे असेल या बाबत निर्माण झालेल्या संभ्रमनाटय़ावर आता पडदा पडला आहे
जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हय़ात प्रवेश करणारे वाधवान बंधु व त्यांचे कुटूंबीय व नोकर चाकर असे एकूण 23 जणांवर सातारा जिल्हा प्रशासनाने पाचगणी येथे इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता जिल्हा प्रशासनाने या सर्वांवर 188 कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाधवान बंधु हे आर्थिक घोटाळयातील आरोपी असुन ते जामिनावर बाहेर आले असल्याचे समोर आले तसेच जिल्हा ओलांडण्यासाठी या उद्योगपतींनी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे खास पत्र घेतल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली व संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले होते.
पाचगणी येथील इन्स्टिटयुशनल क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ईडी अथवा सीबीआय हे आर्थिक घोटाळयाच्या चौकशीसाठी ताब्यात घेतील त्या मुळे वाधवान बंधु यांचा 23 नंतर पुढील मुक्कम दिल्ली येथे असेल असा कयास लावला जात होता परंतु तसे काही झालेले दिसत नाही वाधवान बंधुंना ताब्यात घेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने जिल्हा प्रशासनाने वाधवान बंधु व त्यांचे बरोबर असलेल्या सर्वांना महाबळेश्वर येथील त्यांच्याच बंगल्यात होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज पाचगणी येथे त्या सर्वाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पुर्ण करून आज सायंकाळी पाच वाजता प्रचंड पोलिस बंदाबस्तात वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वर येथे आणण्यात आले वाधवान यांच्या सर्व आलिशान गाडया या पुर्वीच जप्त करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे आज पाचगणी ते महाबळेश्वर या प्रवासासाठी इंडीयन रेड क्रॉस सोसायटी ची बस व सेंट झेवियर्स स्कुलची मिनी बसचा वापर करण्यात आला या दरम्यान त्यांचे बरोबर प्रांताधिकारी संगिता राजापुरकर वाई विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, तहसिलदार सुषमा चौधरी पाटील मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक कोंडुभैरी, पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश पवार व त्यांचे कर्मचारी असा ताफा होता.









