वार्ताहर/शिये
काल, झालेल्या वादळी पावसाने शिये परिसरातील नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिये गावासह, विठ्ठल नगर, हनुमान नगर व रामनगर येथील सुमारे १६० घरांचे तर ३५ जनावरांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. निगवे दुमाला मंडल अधिकारी विलास तोडकर व ग्रामविकास अधिकारी विकास कांबळे यांनी आज, शुक्रवारी या नुकसानीचे पंचनामे केले.
सोसाट्याचा वारा तसेच वीजेच्या कडकडाटास झालेल्या या वादळी पावसात रामनगर व हनुमान नगर या दोन्ही टेकडीवरच्या वसाहतीतील अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. तर शिये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या जिमखाना इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने शैक्षणिक साहित्यांचेही नुकसान झाले. हनुमान नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांवर फळ झाडे उन्मळून पडल्याने झाडांचे आणि पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. कृषी सहाय्यक निलम पाटील यांच्या मार्फत शेती पिकांचे व फळझाडांचे, हरितगृह यांची पहाणी करण्यात आली.
वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त तडाखा बसलेल्या हनुमान नगर मधून सकाळी नऊ वाजल्यापासून ग्राम विकास अधिकारी व व महसूल विभागाच्या वतीने पंचनाम्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, निगवे दुमाला गावातील अवकाळी पावसाने सुमारे ८० घराचे अंदाजे चार लाख इतके नुकसान झाले आहे. तसेच हरीतगृहाचे सुमारे ५ लाख ६० हजार, व केळी पिकाचे एक लाख पन्नास हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. सदर घरांचा पंचनामा तलाठी निवास जाधव, ग्रामसेवक बी एल जाधव, पोलीस पाटील शिवाजी सुतार, सरपंच विक्रम कराडे, सदस्य पंडीत लाड, राजाराम एकशिंगे, महादेव पाटील, योगेश कांबळे, कृषी सहाय्य्क एम. के. मुल्ला, बंडोपंत जासूद, यशवंत मोरे, तुषार एकशिंगे उपस्थित होते.








