आंबा पिकाचे मोठे नुकसान : वीज पुरवठा खंडित
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील अनेक भागात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रीपर्यंत पाऊस व गडगडाट सुरुच होता. गडगडाटामुळे आणि विजेच्या चकमकाटामुळे वादळी पावसानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.
अवकाळी पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले होते. सोमवारी मुसळधार पावसानंतर पुन्हा गुरुवारी पावसाने हजेरी लावली. सांखळी, वाळपई, पेडणे, म्हापसा, जुने गोवे आदी भागात जोरदार वादळी वाऱयासह पाऊस झाला. पणजीत रात्री 8.45 वा.च्या दरम्यान पाऊस पोहोचला. इतर भागातील तुलनेत पणजीत पावसाचा हलकासा शिडकावा झाला. मात्र राज्यातील अनेक भागात वीजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला.
आंबा बागायतदार आले अडचणीत
हा पाऊस आंबा उत्पादकांना फार अडचणीचा ठरला आहे. यंदा दर महिन्याला पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यातल्या त्यात भयंकर उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेला पावसामुळे थोडा फार दिलासा मिळालाही असेल परंतु काजू उत्पादनाप्रमाणे आता आंबा उत्पादनही हातचे जाण्याची शक्यता वाढली आहे. अनेक भागात सायंकाळी जोरदार वादळी वारे वाहिल्याने झाडावर तयार झालेले कच्चे आंबे गळून पडले तर कित्येक झाडांवर असलेल्या आंब्यावर काळे डाग पडले आहेत. आपटून आपटून आंब्याच्या आतील भागावरही विपरित परिणाम झालेला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा उत्पादक अडचणीत आलेले आहेत.
पावसाळय़ाची बेगमी पडली लांबणीवर
अवकाळी पावसाच्या काही तास अगोदर ढगाळ वातावरण असते. त्यामुळे यावर्षी कित्येक दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने कित्येकांना पावसाळ्य़ापूर्वीची बेगमी करता आलेली नाही. वाळवळीचे पदार्थ कडक उन्हात वाळून तयार होतात. दमट वातावरण राहिल्याने सुकवणी हे पदार्थ चांगले वाळले जात नाहीत. त्याचाही विपरित परिणाम झालेला आहे.
आजपासून राज्यात पावसाचा प्रभाव राहाणार नाही असे भाकीत हवामान खात्याने केले असले तरी सायंकाळी वातावरणात पुन्हा बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









