मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही : वादळाने झालेल्या हानीची पाहणी
प्रतिनिधी / मालवण:
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत दिली जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील मनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही केंद्राची मदत पुरवतील, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही वक्तव्याचा समाचार घेताना आपण वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेते नाहीत, तर मुख्यमंत्री आहोत, असा पलटवारही त्यांनी केला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हय़ाचे पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासमवेत मालवण शहरातील चिवला बीच येथे झालेल्या चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी करत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संदेश पारकर, गुरुनाथ खोत, अतुल रावराणे, सुशांत नाईक, मंदार केणी, यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, यशवंत गावकर, बाळू नाटेकर, रमेश कद्रेकर, बाळू मेस्त्राr आदी उपस्थित होते. प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी चिवला बीच येथील स्थानिकांशी नुकसानीबाबत चर्चा केली.
कोकणशी शिवसेनेचे घट्ट नाते!
कोकण आणि शिवसेनेचे नाते अतुट आहे. हे नाते कायमच घट्टा राहील. यासाठी आता आपत्ती काळातही शिवसेनेकडून कोकणसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. कोकणाने आम्हाला भरभरून दिले आहे आणि आम्ही त्याची परतफेडही करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
आपत्कालीन व्यवस्था सक्षम करणार!
गेल्या काही वर्षात कोकणात वादळ व चक्रीवादळांची संख्या आणि त्यामुळे होणाऱया हानीचे प्रमाण वाढले आहे. नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा जास्तीत जास्त सक्षम बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. तौक्ते वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून शासकीय निकषात आवश्यक बदल करून जास्तीत जास्त मदत दिली जाईलच परंतु आम्हाला मदतीपुरतेच मर्यादित राहायचे नसून कोकणात चक्रीवादळाच्या अनुषंगाने काही कायमस्वरुपी काम करण्यावरही आमचा विशेष भर राहणार, असेही ठाकरे म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीकडे लक्ष घालणार!
गतवर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याची माहिती आपल्या निदर्शनास आली असून याबाबत लवकरात लवकर चौकशी करून लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यात येईल. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत आपत्कालीन मदतीचे निकष बदलण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झालेली आहे. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना निकष बदलून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
देवगडमधील दुर्घटनेकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष
शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी देवगड बंदरात झालेल्या बोट दुर्घटना व खलाशांच्या मृत्यूकडे मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले. जिल्हय़ात ठिकठिकाणी झालेल्या मच्छीमारांच्या नुकसानीचीही माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक घटकास न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.
पत्रकारांना प्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा द्या!
पत्रकार संघाचे राज्य पदाधिकारी नंदकिशोर महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रकारांना प्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लवकरात लवकर लसीकरण आणि औषधोपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली. महाजन यांनी सहा राज्यांमध्ये पत्रकारांना प्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा दिला गेला असल्याकडेही त्यांचे लक्ष वेधले.









