गृहमंत्री बसवराज बोम्माई : आयपीएस सौमेंदू मुखर्जी यांच्यावर जबाबदारी
प्रतिनिधी / बेंगळूर
नेते रमेश जारकीहोळी यांना राजीनामा देण्यास कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त सीडी प्रकरणाची एसआयटीमार्फत (स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीम) चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बुधवारी रात्री गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी याबाबतचा आदेश दिला. आयपीएस अधिकारी सौमेंदू मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक सीडी प्रकरणाचा तपास करणार आहे.
बसवराज बोम्माई यांनी बुधवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सीडी प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना दिली.
9 मार्च रोजी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्याला पत्र पाठवून बेंगळूरच्या कब्बन पार्क पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीमागे आपली बदनामी करण्याचा हेतू होता. त्यामुळे अनेक जणांनी षड्यंत्र रचल्याचे स्पष्ट होत आहे, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आपण कारस्थानामागे असणाऱयांची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. एडीजीपी सौमेंदू मुखर्जी यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे, असे बोम्माई यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.









