रविवारी दोघे जण ताब्यात : आतापर्यंत याप्रकरणी आठ जणांची चौकशी
प्रतिनिधी / बेंगळूर
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या वादग्रस्त सीडी प्रकरणाच्या तपासाची चक्रे एसआयटीने गतिमान केली आहेत. त्यानुसार रविवारी पुन्हा दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. वादग्रस्त सीडीप्रकरणी आपल्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप करून माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.
सीडीमध्ये असलेल्या युवतीचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला एसआयटीने रविवारी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत याप्रकरणी आठ जणांची चौकशी करण्यात आली असून दोघांना अटक केली आहे. एसआयटी पथकाची स्थापणा केल्यानंतर अधिकाऱयांनी तात्काळ 5 जणांची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते.
सीडी प्रकरणातील युवतीला हैदराबादमधून अटक
सीडी प्रकरणातील युवतीसह तिघांना एसआयटी पथकाच्या अधिकाऱयांनी रविवारी हैदराबादमधून ताब्यात घेतले आहे. सीडी प्रकरण उघडकीस येताच किंगपीनसह बेपत्ता झालेल्या युवतीला ताब्यात घेऊन त्यांना बेंगळूरला आणले आहे. तसेच त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. युवतीला सुरक्षा पुरविण्यासाठी 3 महिला पोलिसांची नेमणूक केल्याचे समजते. खबरदारी म्हणून केएसआरपीची एक तुकडी बोलाविण्यात आली आहे.









