ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱया पुस्तकावरून देशभरात आंदोलने सुरू झाल्यानंतर आज, भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश लेखकाला दिले आहेत. लेखक जयभगवान गोयल यांना पुस्तक मागे घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती, भाजप उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
नवी दिल्लीत रविवारी भाजप मुख्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यानंतर या पुस्तकावर सर्व स्तरातून टीका सुरू झाली. भाजप आणि लेखक जयभगवान गोयल यांना लक्ष करण्यात आले होते.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत, शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या पुस्तकावर लगेचच बंदी घाला, अशी मागणी भाजपा नेतृत्वाकडे केली होती. आज राज्यातील विविध ठिकाणी या पुस्तकाचे तसेच लेखकाच्या छायाचित्रांचे प्रतिकात्मक दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला.